बनावट फेसबुक अकाऊंट बनविणारी टोळी सक्रिय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:08 AM2021-05-30T04:08:38+5:302021-05-30T04:08:38+5:30
वाडी : बनावट फेसबुक अकाऊंट तयार करून त्यावर संबंधित व्यक्तीच्या जवळच्या लोकांना पैशाची मागणी करणारी टोळी पुन्हा एकदा सक्रिय ...
वाडी : बनावट फेसबुक अकाऊंट तयार करून त्यावर संबंधित व्यक्तीच्या जवळच्या लोकांना पैशाची मागणी करणारी टोळी पुन्हा एकदा सक्रिय झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वाडी येथील पत्रकार सुरेश फलके यांचे फेसबुक अकाऊंट आहे. २७ मे रोजी कुणीतरी अज्ञात व्यक्तीने सुरेश फलके यांच्या फोटोचा व नावाचा वापर करून व स्वत:चा मोबाईल नंबर टाकून बनावट फेसबुक अकाऊंट तयार केले. यानंतर फलके यांच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींना फ्रेंड्स रिक्वेस्ट पाठवून ज्यांनी रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केली त्यांच्या व्हाॅट्सअॅवर माझी फॅमिली अडचणीत आहे. मित्राच्या आजारी मुलीला मदत करायची आहे. अत्यंत महत्त्वाचे काम आहे, असे असे मॅसेज पाठवून ८ हजार, १० हजार, १३ तर काहींना २० हजार रुपयांची मागणी केली. यानंतर उद्या पैसे परत करतो, असाही मॅसेज पाठविला. हा मॅसेज सर्वत्र व्हायरल होत असताना सुरेश फलके यांना त्यांच्या मित्रांनी व नातेवाईकांनी फोन करून आपल्याला पैशाची गरज आहे का, याबाबत फोनवरून विचारणा केली असता हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. याबाबत त्यांनी वाडी पोलिसात संबंधित अज्ञात इसमाच्या विरोधात लेखी तक्रार दाखल केली. हा प्रकार मागील काही दिवसापासून अनेकांशी घडलेला असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारताना शहानिशा करून किंवा पैशाची मागणी केल्यास संबंधितांशी प्रत्यक्ष बोलून आर्थिक व्यवहार करावा. तसेच अशा मॅसेजला प्रतिसाद न देता याबाबत सक्रिय राहत कुणीही बळी न पडण्याचे आवाहन वाडीचे ठाणेदार प्रदीप सूर्यवंशी यांनी केले आहे.