नागपूर पोलीस आयुक्तांसह भंडारा अधीक्षकांचे ‘फेक प्रोफाईल’, सावध राहण्याचे आवाहन
By योगेश पांडे | Published: September 4, 2023 12:38 PM2023-09-04T12:38:22+5:302023-09-04T12:42:13+5:30
आयपीएस अधिकाऱ्यांचे फेसबुक खाते सायबर गुन्हेगारांच्या टार्गेटवर
नागपूर : सायबर गुन्हेगारांकडून अनेकदा सोशल मीडियावर अनेकांचे ‘फेक प्रोफाईल’ तयार करून त्या माध्यमातून त्यांच्या मित्रमंडळींनी पैसे मागण्यात येतात. मात्र आता या गुन्हेगारांनी थेट आयपीएस अधिकाऱ्यांकडेच मोर्चा वळवला आहे. नागपूर पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि भंडाराचे पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांचे फेसबुकवर फेक प्रोफाईल तयार करण्यात आले आहे. या अधिकाऱ्यांनी स्वत: सोशल माध्यमांवर ही माहिती शेअर करत त्यांच्या फ्रेंडलिस्टमधल्यांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे.
नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार हे सोशल माध्यमांवर सक्रिय असतात. फेसबुकवर त्यांचे प्रोफाईल असून त्यावर त्यांनी त्यांचा तपशीलदेखील टाकला आहे. मात्र काही दिवसांअगोदर त्यांच्या प्रोफाईल पिक्चरचा उपयोग करून अज्ञात व्यक्तीने फेक प्रोफाईल तयार केले व अनेकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली. कुमार यांचेच प्रोफाईल असल्याचा समज झाल्याने अनेकांनी त्याचा स्वीकारदेखील केला. ही बाब अमितेश कुमार यांना कळताच त्यांनी फेसबुकवर याबाबत पोस्ट केली.
तोतयागिरी करून अज्ञात व्यक्तीने माझे बनावट फेसबुक खाते तयार केल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे आरोपी माझे प्रोफाईल पिक्चर आणि कव्हर फोटो वापरुन लोकांना फसवण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारताना सत्यता पडताळून पहा. या बनावट खातेधारकाला कोणतीही वैयक्तिक माहिती देऊ नका. तसेच कुणीही माझा संदर्भ देणाऱ्यांशी किंवा इतर कुणाशीही आर्थिक व्यवहार करू नका, असे आवाहन अमितेश कुमार यांनी केले आहे. याच पद्धतीने लोहीत मतानी यांचेदेखील फेक अकाऊंट उघडण्यात आले आहे. ही दोन्ही खाती काही दिवसांअगोदरच उघडण्यात आली असल्याचे दिसून येत आहे.