सायबर गुन्हेगाराने बनवली एम्सच्या संचालकांची बनावट इन्स्टाग्राम आयडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2021 10:35 PM2021-12-17T22:35:19+5:302021-12-17T22:36:38+5:30
Nagpur News अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (एम्स)च्या संचालक आणि सीईओ मेजर जनरल डॉ. विभा दत्ता यांच्या नावाने सायबर गुन्हेगाराने बनावट इस्टाग्राम अकाउंट बनविले.
नागपूर - अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (एम्स)च्या संचालक आणि सीईओ मेजर जनरल डॉ. विभा दत्ता यांच्या नावाने सायबर गुन्हेगाराने बनावट इस्टाग्राम अकाउंट बनविले. त्यावर नोकरभरतीची जाहिरात टाकून त्या भामट्याने पैशाची मागणी चालवली आहे. ही धक्कादायक बाब शुक्रवारी चर्चेला आली आहे.
विशेष म्हणजे, डॉ. विभा दत्ता यांचे इस्टाग्रामवर अकाउंटच नाही. तरीसुद्धा सायबर गुन्हेगाराने त्यांच्या पद आणि नावाचा गैरवापर करून हे बनावट अकाउंट तयार केले. एम्समध्ये नोकरभरती केली जाणार असल्याची थाप मारत सायबर गुन्हेगाराने बेरोजगारांना नोकरीचे आमिष दाखवले आहे.
सायबर गुन्हेगाराने या बनावट जाहिरातीत आपला बँक अकाउंट नंबर नमूद केला असून त्यात पैसे जमा करण्यास सांगितले आहे. ९ डिसेंबरला डॉ. विभा दत्ता यांच्या संपर्कातील व्यक्तीच्या लक्षात हा गैरप्रकार आला. त्याने डॉ. विभा दत्ता यांना ते कळविले. त्यानंतर डॉ. विभा दत्ता यांनी सोनेगाव ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी या प्रकरणात शुक्रवारी फसवणूकीचा गुन्हा दाखल केला. सायबर शाखेच्या माध्यमातून हे बनावट अकाउंट ब्लॉक करण्यात आले असून, पोलिसांनी सायबर गुन्हेगाराची चाैकशी सुरू केली आहे.
आमिषाला बळी पडू नका
अशा प्रकारच्या कोणत्याही आमिषाला बेरोजगारांनी बळी पडू नये. आपली रक्कमही सायबर गुन्हेगाराच्या हवाली करू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
----