बोगस पत्रकार मुन्ना पटेलकडून मेडिकलमध्ये पोलिसांवरच हल्ला; जनतेत चिंतेचे वातावरण
By योगेश पांडे | Published: December 5, 2023 07:32 PM2023-12-05T19:32:44+5:302023-12-05T19:33:52+5:30
नागपुरातील बोगस पत्रकारांचा सुळसुळाट कधी कमी होणार?
योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: ताब्यात असलेल्या खंडणीखोर व बोगस पत्रकाराकडून मेडिकल परिसरात त्याच्या बंदोबस्तात तैनात असलेल्या पोलिसावरच हल्ला करण्यात आला. संबंधित आरोपीला न्यायालयाच्या निर्देशांनुसार वैद्यकीय तपासणीसाठी आणण्यात आले होते. अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
मुन्ना उर्फ मुस्ताक अहमद खान पटेल (४५, भूपेशनगर, महेशनगर) असे आरोपीचे नाव आहे. तो बोगस पत्रकार असून, दुकानदारांना धमकावून खंडणी वसुली करायचा. अनेक काळापासून त्याचा हा प्रकार सुरू होता. त्याला एका कॅफेचालकाकडून एक लाखाची खंडणी मागण्याच्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्याला २ डिसेंबर रोजी न्यायालयासमोर सादर करण्यात आले. त्याला जेल वॉरंट मिळाल्याने त्याची वैद्यकीय तपासणीसाठी मेडिकल इस्पितळात नेण्यात आले. सुखदेव गिरसावरे, नितेश पारधे, दिनेश जुमनाके, उज्वल पाटेकर हे कर्मचारी त्याला मेडिकलमध्ये घेऊन गेले. त्याला ट्रॉमामध्ये नेत असताना मुन्नाने पोलिसांना शिविगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच त्याने नितेश पारधे यांना बोखडले व हाताबुक्क्यांनी मारहाण सुरू केली. त्याने पळून जाण्याचाही प्रयत्न केला. त्याला पकडल्यावर त्याने ‘मी तुमची वर्दी उतरवेन, सस्पेंड करून टाकेन,’ अशी धमकीदेखील दिली. अखेर त्याला गाडीत टाकण्यात आले. त्यानंतरही त्याचा आरडाओरडा सुरूच होता. त्याच्याविरोधात अजनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इतर बोगस पत्रकारांचे काय ?
स्वत:ला पत्रकार म्हणवून घेत कामावरून काढून टाकण्याची धमकी देण्यापर्यंत मुन्नाची मजल गेली. त्याच्याप्रमाणे शहरात अनेक बोगस पत्रकार फिरत आहेत. ते अनेकांकडून खंडणी वसुली करतात. बदनामीच्या भीतीपोटी लोकदेखील तक्रारीसाठी समोर येत नाहीत, अशा पत्रकारांवर वचक आणण्याची आवश्यकता आहे.