हे काय... कुंपणानंच शेत खाल्लं! ३२ जणांच्या नावे फेक कर्ज उचललं
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2023 12:14 PM2023-09-20T12:14:04+5:302023-09-20T12:16:36+5:30
साडेएकवीस लाखांचा चुना, बँकेच्या व्यवस्थापकासह ९ आरोपींवर गुन्हा
नागपूर : बँकेच्या व्यवस्थापकासह नऊ आरोपींनी तब्बल साडेएकवीस लाखांचा चुना लावला. या आरोपींनी ३२ ग्राहकांच्या नावे बनावट कर्ज उचलले तसेच अनेक ग्राहकांच्या ईएमआयच्या रकमेवरदेखील डल्ला मारला. मानकापूर पोलिस ठाण्यात या आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे नऊपैकी आठ आरोपी महिला आहेत.
मानकापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील लक्ष्मी प्लाझा येथे उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेची शाखा असून, तेथे विजय रघुनाथ कडू (४७, तळेगाव, अमरावती) हा व्यवस्थापक होता. त्याने बँकेतील सहायक व्यवस्थापक चेतना राजेश आगरकर (३०, धामणगाव, अमरावती), तसेच तीन कॅशिअर स्नेहल सुभाष शंभरकर (२६, चितोडा, वर्धा), तेजस्विनी सत्यपाल भगत (२८, वायगाव निपाणी, वर्धा), वैष्णवी वंजारी यांच्यासह मिळून ३२ ग्राहकांच्या नावे बनावट अर्ज भरून कर्ज उचलले. या प्रकारात त्यांना संस्कृती सिद्धार्थ घरडे (२६, चिंतोडी, वर्धा), चांदणी श्रीराम बरे (२६, टिमक, तिनखेडा, नागपूर), फाल्गुनी रवी जांगळे (२५, कोराडी, महादुला), कृतिका राजू (३०, कौशल्यानगर, बाबुलखेडा) यांनीदेखील मदत केली.
१३ ऑगस्ट २०२१ ते ३ डिसेंबर २०२१ या कालावधीत या नऊ आरोपींनी ३२ ग्राहकांच्या नावाने कर्ज घेतले. तसेच अनेक ग्राहकांनी विश्वासाने सोपविलेली कर्जाच्या मासिक हप्त्याची रक्कम बँकेत जमा न करता स्वत:कडे ठेवून घेतली. त्यांनी या पद्धतीने २१ लाख ५० हजार रुपयांचा घोटाळा केला. बँकेच्या तपासणीत ही बाब समोर आली. तत्कालीन व्यवस्थापक निखिलेश कोटांगळे (३४) यांनी मानकापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या चौकशीनंतर नऊ आरोपींविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असून, शोध सुरू आहे.