नकली औषध, नकली सरकार, बनावट औषधांच्या घोटाळ्यावर विरोधकांचे आंदोलन

By मंगेश व्यवहारे | Updated: December 21, 2024 12:27 IST2024-12-21T12:26:53+5:302024-12-21T12:27:20+5:30

राज्य विधीमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीच्या आमदारांनी बनावट औषध घोटाळ्याचा मुद्दा उचलत विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले.

Fake medicine, fake government, opposition protests over fake medicine scam | नकली औषध, नकली सरकार, बनावट औषधांच्या घोटाळ्यावर विरोधकांचे आंदोलन

नकली औषध, नकली सरकार, बनावट औषधांच्या घोटाळ्यावर विरोधकांचे आंदोलन

मंगेश व्यवहारे 

नागपूर : राज्य विधीमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीच्या आमदारांनी बनावट औषध घोटाळ्याचा मुद्दा उचलत विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. यावेळी ‘नकली औषध, नकली सरकार’, ‘बनावट बहुमत, बनावट औषध’ अशा घोषणा देण्यात आल्या. 

अंबाजोगाईतील शासकीय स्वराती रुग्णालयात बनावट औषधांचा पुरवठा झाल्यानंतर दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणी द्विसदस्य चौकशी समिती स्थापना करण्यात आली आहे. यानंतर राज्यात पाच बनावट कंपन्यांच्या नावे अकरा जिल्ह्यांमध्ये बनावट औषधांचा पुरवठा होत असल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे. सामान्यांच्या आरोग्याशी सुरू असलेल्या हयगयीचा मुद्दा उचलत विरोधकांनी शनिवारी आंदोलन केले.

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात विजय वडेट्टीवार, नाना पटोले, वरुण सरदेसाई, डॉ. नितीन राऊत आदींचा सहभाग होता. ‘बोगस औषधांचा सुळसुळाट, जनतेच्या खिशाला खडखडाट’ अशा घोषणा लिहीलेले फलक आंदोलनादरम्यान झळकविण्यात आले. अंबादास दानवे म्हणाले,‘डॉक्टरांनी बनावट औषधांची ओळख पटवून त्यांचा वापर थांबवला. पण, सरकारने वेळीच कारवाई केली नाही. तक्रारी असुनही दीड वर्षांपासून चौकशी झाली नाही. यावरून राज्याच्या प्रशासनाची अकार्यक्षमता आणि बेफिकिरी दिसून येत आहे. ज्या कंपन्यांनी औषध पुरवठा केला त्यांची कोणतीही नोंद नाही. त्या कंपन्यांची वेबसाईटही अस्तित्वात नाही. तरीही त्यांना कंत्राट कसे देण्यात आले. संबंधित मंत्र्यांनी यावर कोणतीही कारवाई केली नाही. सरकार लोकांच्या जिवाशी खेळत आहे. या प्रकरणाची साठ दिवसात सखोल चौकशी करण्यात यावी. चौकशी झाली नाही तर मोठे आंदोलन उभे करण्यात येईल.’

Web Title: Fake medicine, fake government, opposition protests over fake medicine scam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.