महानिर्मिती मध्ये नोकरी संदर्भात बनावटी ऑफर लेटर ‘व्हायरल’
By आनंद डेकाटे | Published: June 29, 2024 06:04 PM2024-06-29T18:04:43+5:302024-06-29T18:05:17+5:30
बेरोजगार तरुण-तरुणींनी सावध राहावे, महानिर्मितीचे आवाहन : पोलिसांत तक्रार करणार
आनंद डेकाटे, नागपूर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महानिर्मितीमध्ये नोकरी संदर्भात समाज माध्यमांवर दोन बनावटी (फेक) नियुक्ती पत्रे व्हायरल होत आहेत. यासंदर्भात महानिर्मितीने असल्या प्रकारची कुठलीही प्रक्रिया राबविली नसल्याचे स्पष्ट केले आहे. महानिर्मितीच्या लेटरहेडचा तसेच अधिकारी नाव आणि पदनामाचा हा गैरवापर आहे. हे पूर्णत: गैरकृत्य असून बेरोजगारांची दिशाभूल, भावनेशी खेळण्याचा,आर्थिक शोषण करण्याचा प्रयत्न आहे. या संदर्भात लवकरच पोलिसात तक्रार करण्यात येणार असल्याचेही म्हटले आहे.
महानिर्मितीमध्ये मनुष्यबळ भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबविण्याची रीतसर प्रक्रिया आहे. महानिर्मितीमध्ये थेट नियुक्ती अथवा निवड करण्यात येत नाही. तेव्हा बेरोजगार तरुण-तरुणींना आवाहन करण्यात येते की, महानिर्मितीमध्ये थेट नोकरी लावून देण्याचे आमिष देणाऱ्या अथवा महानिर्मिती नोकरी संदर्भात कुठलाही गैरप्रकार आढळल्यास त्वरित जवळच्या महानिर्मिती कार्यालयास अथवा पोलिसांना कळवावे. बेरोजगार तरुण-तरुणींनी अशाप्रकारच्या समाज विघातक प्रलोभनांपासून दूर राहावे. महानिर्मिती भरती प्रक्रियेसंबंधी महानिर्मितीच्या (www.mahagenco.in) संकेतस्थळावरून वेळोवेळी माहिती घ्यावी आणि वरील गैरप्रकारापासून परावृत्त व्हावे, महानिर्मितीचे कार्यकारी संचालक(मानव संसाधन) डॉ. धनंजय सावळकर यांनी म्हटले आहे.
महानिर्मिती भरती प्रक्रिया पद्धती
महानिर्मिती कंपनीमध्ये नोकरीवर लागण्याकरिता ऑनलाईन/ऑफलाईन पद्धतीने भरती प्रक्रिया राबविण्यात येते. ज्यामध्ये वृत्तपत्रांत जाहिरात प्रसिद्ध करण्यात येते सोबतच महानिर्मितीच्या संकेतस्थळावर तपशीलवार माहिती देखील उपलब्ध करून देण्यात येते. त्यानंतर लेखी परीक्षा व तोंडी परीक्षेसंदर्भात संबंधित उमेदवारांना वेळोवेळी कळविण्यात येते. मूळ कागदपत्रे तपासल्यानंतर निवडीबाबतची अंतिम यादी महानिर्मितीच्या संकेतस्थळावर देण्यात येते.