बेडवर बनावट रुग्ण, खरे येताच हाेतात पसार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:07 AM2021-05-01T04:07:52+5:302021-05-01T04:07:52+5:30
नवी दिल्ली : बस किंवा रेल्वेने प्रवास करताना खिडकीजवळच्या सीटवर रुमाल ठेवून ती सीट काबीज करण्याचा प्रकार आपल्या सर्वांना ...
नवी दिल्ली : बस किंवा रेल्वेने प्रवास करताना खिडकीजवळच्या सीटवर रुमाल ठेवून ती सीट काबीज करण्याचा प्रकार आपल्या सर्वांना माहिती आहे. काेराेना महामारीच्या भयावह काळात खासगी रुग्णालयांकडून हाच खेळ खेळला जात आहे. या काळात लाॅकडाऊनमुळे राेजगार नसलेल्या बेराेजगार तरुणांना बनावट रुग्ण बनवून रुग्णालयातील बेड अडवून ठेवला जाताे आणि श्रीमंत रुग्ण येताच त्या बनावट रुग्णाला पसार केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समाेर येत आहे.
साेशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमधून खासगी रुग्णालयांचा हा बाेगसपणा उजेडात आला आहे. नुकतेच नाेएडा येथे उत्तर प्रदेश प्रशासनाने धाड घातली तेव्हा एका रुग्णालयात एक-दाेन नाही तर २०० बनावट रुग्ण भरती असल्याचे आढळून आले. म्हणजे एका क्षणात २०० बेड रिकामे झाले.
हा बाेगसपणा सुरू हाेताे बनावट रुग्णासह. एखाद्या गरजवंताला १००० ते ५००० रुपये प्रतिदिन पैशाचे आमिष दाखवून त्याचा बाेगस आरटी-पीसीआर रिपाेर्ट तयार केला जातो. त्यानंतर पाॅझिटिव्ह म्हणून त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले जाते. रुग्ण भरती केला म्हणजे त्याच्यासाठी बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, रेमडेसिविर इंजेक्शन व इतर औषधांची गरज तर पडणारच. त्यासाठी प्रशासन, अधिकारी व विभागाला रुग्णाची माहिती दिली जाते. हा रुग्ण आमच्या रुग्णालयात दाखल असल्याचे सांगून काेराेना रुग्णासाठी आवश्यक औषधांची मागणी केली जाते. औषधांचा पुरवठा झाला की त्याची साठवणूक केली जाते. रुग्ण बनावट असला तरी त्याचे आधारकार्ड खरे असल्याने संशयाला जागा उरत नाही.
आता प्रतीक्षा केली जाते एखाद्या श्रीमंत असामीची. मग कुणी आजाराच्या परिस्थितीने पिचलेला बिचारा श्रीमंत असामी भटकंती करीत रुग्णालयात येताे. मग त्याला बेड मिळेल पण दीड-दाेन लाख रुपये लागतील, असे सांगितले जाते. अर्थातच जीवासाठी ताे तयार हाेताेच. त्याने जसा हाेकार दिला, तसा बनावट रुग्णाला जसे पाॅझिटिव्ह केले, तसाच निगेटिव्ह असल्याचा बनावट रिपाेर्ट तयार करून बाहेरचा रस्ता दाखविला जाताे. यानंतर सुरू हाेते खऱ्या श्रीमंत रुग्णाचे शाेषण. त्याला औषध तर मिळणार नाही, मग ताे रुग्णालय प्रशासनासमाेर विनवणी करताेच. यावेळी साठवणूक केलेले औषध अधिक किमतीत आणि तेही उपकार केल्याच्या आविर्भावात त्याला दिले जाते. असा चालताे सारा बाेगस रुग्णालयांच्या बाेगसपणाचा खेळ.
यूपीमध्ये तपास सुरू
नाेएडा येथे धाडीमध्ये २०० बेड रिकामे करणाऱ्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक खासगी रुग्णालये ऑक्सिजन आणि औषध संपल्याची अफवा उडवीत लाेकांमध्ये घबराट निर्माण करतात. उत्तर प्रदेशात आता सरकारच्या आदेशानुसार जमीनस्तरावर चाैकशी सुरू करण्यात आली आहे. मात्र इतर राज्यात काय अवस्था आहे, ही बाब सरकारने चाैकशी केल्यावरच समाेर येऊ शकेल. या खेळात शासकीय अधिकारी, प्रशासन आणि स्थानिक सरकारांची हातमिळवणी असल्याचा दावा सध्या व्हायरल हाेणाऱ्या व्हिडीओद्वारे केला जात आहे.