कसब्यातील पराभवानंतर ‘फेक पोस्ट व्हायरल’, गडकरींच्या कार्यालयाकडून पोलिसांत तक्रार
By योगेश पांडे | Published: March 3, 2023 01:41 PM2023-03-03T13:41:56+5:302023-03-03T13:42:49+5:30
गडकरींच्या नावाखाली व्हॉट्सअपवर दिशाभूल करणारी वक्तव्ये फॉरवर्ड
नागपूर : भाजपने ईशान्येकडील तीन राज्यांत चांगली कामगिरी केली असली तरी महाराष्ट्रात पुण्यातील कसबापेठ येथील विधानसभेची जागा पक्षाला गमवावी लागली. या पराभवानंतर विविध चर्चांना उधाण आले असताना केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या नावाने सोशल माध्यमांवर तथ्यहीन पोस्ट ‘व्हायरल’ करण्यात येत आहे. यासंदर्भात गडकरींच्या कार्यालयाकडून नागपूर पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे.
सोशल माध्यमांवर गडकरींच्या नावाखाली व्हॉट्सअपवर दिशाभूल करणारी वक्तव्ये फॉरवर्ड केली जात आहेत. ही बाब गडकरी यांच्या कार्यालयाने गंभीरतेने घेतली असून नागपूर पोलिसांकडे यासंदर्भात तक्रार करण्यात आली आहे. गडकरींचे नाव वापरून अशा प्रकारे खोट्या व तथ्यहीन पोस्ट व बातम्या पसरविणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची विनंती नागपूर पोलिसांना करण्यात आली आहे.