बनावट ‘सॅनिटायझर’ विकणारे रॅकेट नागपुरात सक्रिय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 12:19 PM2020-03-16T12:19:43+5:302020-03-16T12:21:08+5:30

कोरोनाला अटकाव करण्यास सहाय्यभूत ठरू पाहणाऱ्या सॅनिटायझरमध्ये भेसळ करून नागरिकांच्या आरोग्यासोबत खेळणारे रॅकेट सक्रिय असल्याची खळबळजनक माहिती उघड झाली आहे.

fake 'sanitizer' selling Racket active in Nagpur | बनावट ‘सॅनिटायझर’ विकणारे रॅकेट नागपुरात सक्रिय

बनावट ‘सॅनिटायझर’ विकणारे रॅकेट नागपुरात सक्रिय

Next
ठळक मुद्देराज्यभरात अनेक ठिकाणी कारवाई सूत्रधार अंधारात, आरोपीने उडविला डाटा

नरेश डोंगरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाला अटकाव करण्यास सहाय्यभूत ठरू पाहणाऱ्या सॅनिटायझरमध्ये भेसळ करून नागरिकांच्या आरोग्यासोबत खेळणारे रॅकेट सक्रिय असल्याची खळबळजनक माहिती उघड झाली आहे. एमआयडीसी पोलिसांनी शुक्रवारी नागपुरात एकाला अटक केल्यानंतर त्याच्या चौकशीतून अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या आहेत. तिकडे ठाणे, मुंबई, नाशिकमध्येही असेच बनावट सॅनिटायझर जप्त करण्यात आले आहे. दरम्यान, नागपुरात पकडल्या गेलेल्या दोनपैकी एका आरोपीने रातोरात आपल्या मोबाईलमधून या रॅकेटशी संबंधित डाटा डीलिट केला. त्यामुळे या रॅकेटचा छडा लावण्याचे आव्हान पोलिसांपुढे उभे ठाकले आहे. वरिष्ठांनी या प्रकरणात लक्ष घालून रॅकेटच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केल्यास अनेक धक्कादायक खुलासे होऊ शकतात.
सर्वत्र प्रचंड दहशत निर्माण करणाºया कोरोना विषाणूला प्रतिबंध करण्यासाठी सॅनिटायझर उपयुक्त असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. कोरोनाला दूर ठेवण्यासाठी अन्य उपायांसोबतच सॅनिटायझरचा वेळोवेळी वापर करण्याचाही सल्ला दिला जात आहे. त्यामुळे बाजारात
सॅनिटायझरची प्रचंड मागणी वाढली आहे. ती लक्षात घेता समाजकंटकांनी बनावट सॅनिटायझरची निर्मिती करून ते विकण्याचा सपाटा लावला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, हे बनावट सॅनिटायझर निर्माण करणाºया रॅकेटने त्यात मोठ्या प्रमाणात स्पिरिटचा वापर केला आहे.
एमआयडीसी पोलिसांनी जप्त केलेल्या सॅनिटायझरमध्ये स्पिरिट, विशिष्ट रसायन आणि पाण्याचा वापर केल्याची माहिती पुढे आली आहे. नामांकित कंपन्यांकडून निर्मित सॅनिटायझरला खाली टाकून आगपेटीची काडी उगाळल्यास ती काही वेळपर्यंत जळते. मात्र, रॅकेटने तयार केलेल्या सॅनिटायझरमध्ये मोठ्या प्रमाणात स्पिरिट अन् कापरासारखा पदार्थ वापरल्यामुळे ते बराच वेळपर्यंत जळत राहते. या रॅकेटने नागपूरसह विविध शहरात बनावट सॅनिटायझरची प्रचंड प्रमाणात विक्री केली आहे. कोरोनाला रोखण्याऐवजी नागरिकांच्या आरोग्याला अपाय पोहचविणारे हे बनावट सॅनिटायझर एमआयडीसी पोलिसांनी जप्त करून शुक्रवारी सायंकाळी विकी खानचंदानी याला तर तिकडे नाशिकमध्येही असाच बनावट साठा ताब्यात घेण्यात आल्याने रॅकेट सतर्क झाले. नागपुरातील रॅकेटचा सदस्य जितेंद्र मुलानी याने रातोरात त्याच्याकडचा साठा कुठे हलविला, हे कळण्यास मार्ग नाही. त्याने त्याच्या मोबाईलमधील डाटाही पूर्ण नष्ट केला. आपण हे फेसबुकच्या माध्यमातून मागितल्याची दिशाभूल करणारी माहिती तो पोलिसांना देत आहे. बाकीचा साठा कुठे आहे, ते तो सांगायला तयार नाही.

नजीकच्या प्रांताशी धागेदोरे ... नागपुरातच बॉटलिंग ...
हे रॅकेट नेमके कोण आणि कुठून संचलित करीत आहे, ते अजून उघड झाले नाही. मात्र, बनावट सॅनिटायझरचा कच्चा माल मध्य प्रदेशातून नागपुरातून पाठविला जात असल्याची सूत्रांची माहिती आहे. उत्तर प्रदेश आणि छत्तीसगडमध्येही या रॅकेटचे नेटवर्क असून, नागपुरात मोठ्या प्रमाणात बॉटलिंग करून ते बाजारात पाठविले जात असल्याचीही माहिती पुढे आली आहे. या रॅकेटने अनेक ठिकाणी बनावट सॅनिटायझर विकण्यासाठी ठेवल्याचीही माहिती आहे.

Web Title: fake 'sanitizer' selling Racket active in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.