मुंबई सायबर क्राईम विभागाच्या कारवाईचा धाक, तोतया अधिकाऱ्याचा ४.८० लाखांचा गंडा
By योगेश पांडे | Published: June 6, 2024 04:33 PM2024-06-06T16:33:03+5:302024-06-06T16:34:21+5:30
Nagpur : पोलीस तक्रार झाल्याचे सांगून त्यातून बाहेर निघण्यासाठी एका व्यक्तीची ४.८० लाखांची फसवणूक
योगेश पांडे - नागपूर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुंबईत तुमच्या नावाने बॅंक खाते उघडण्यात आले असून त्यात २५ लाख रुपये जमा झाले आहे. तुमच्याविरोधात तक्रार दाखल झाली असून कारवाई करण्यात येईल, असा धाक दाखवून एका व्यक्तीची ४.८० लाखांची फसवणूक करण्यात आली. समोरील व्यक्तीने तो मुंबईच्या सायबर क्राईम विभागातून बोलत असल्याची बतावणी केली होती. अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
मननप्रसाद ताराचंद भोडेकर (५६, रवीनगर) यांना ३० एप्रिल रोजी अज्ञात मोबाईलधारकाचा फोन आला. त्याने तो मुंबई पोलिसांच्या सायबर सेलमधून बोलत असल्याचे सांगितले. अंधेरीत तुमचे खाते उघडले असून त्यात २५ लाख रुपये जमा झाले आहेत. तुमच्याविरोधात पोलीस तक्रार झाली आहे. जर त्यातून बाहेर निघायचे असेल तर पैसे द्यावे लागतील असे समोरील तोतया अधिकाऱ्याने म्हटले. त्याच्या बोलण्याला घाबरलेल्या भोडेकर यांनी हैदराबाद येथील इंडसइंड बॅंकेत ४.८० लाख रुपये ऑनलाईन माध्यमातून पाठविले. त्यानंतर भोडेकर यांना त्यांची फसवणूक झाल्याची बाब लक्षात आली. त्यांच्या तक्रारीवरून अंबाझरी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.