नागपुरात तयार होणार ‘फाल्कन’ विमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2019 12:57 PM2019-02-13T12:57:45+5:302019-02-13T13:00:40+5:30
येत्या तीन वर्षात फाल्कन-२००० हे एक्झिक्युटिव्ह जेट विमान संपूर्णपणे नागपूरमधील मिहान-एसईझेडमध्ये तयार करण्याची योजना द सॉल्ट रिलायन्स एअरोस्पेस लिमिटेडने (डीआरएएल) तयार केली आहे, अशी माहिती एमएडीसीमधील उच्चपदस्थ सूत्रांनी दिली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : येत्या तीन वर्षात फाल्कन-२००० हे एक्झिक्युटिव्ह जेट विमान संपूर्णपणे नागपूरमधील मिहान-एसईझेडमध्ये तयार करण्याची योजना द सॉल्ट रिलायन्स एअरोस्पेस लिमिटेडने (डीआरएएल) तयार केली आहे, अशी माहिती एमएडीसीमधील उच्चपदस्थ सूत्रांनी दिली आहे.
यासाठी डीआरएएलने पाच कलमी कार्यक्रम तयार केला आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात कंपनी हँगरचे बांधकाम पूर्ण करून कॉकपिट शेल व नोज कोनचे उत्पादन करणार आहे. डीआरएएलने हा टप्पा पूर्ण केला असून गेल्याच आठवड्यात पहिले कॉकपिट शेल द सॉल्ट एव्हिएशनला हस्तांतरित केले आहे. दुसऱ्या टप्प्यात कंपनी विमानाचे फिन (विमानाला एअरो डायनॅमिक करण्यासाठी बसवले जाणारे पंख) व फिरते पार्टस् (पंखांमधील एलेरॉन्स व फ्लॅप्स) बनवणार आहे. तिसºया टप्प्यात डीआरएएल हॉरीझॉन्टल स्टॅबिलायझिंग असेम्ब्ली (विमानाचे फ्यूजीलाज) खिडक्या असलेले नळकांडे) तयार करणार आहे. चौथ्या टप्प्यात फ्यूजीलाज मेटींग (नळकांडे पंख्यांशी जोडण्याचे काम) होईल व शेवटच्या पाचव्या टप्प्यात विमानाचे इंजिन बसवून सर्व सुटे भाग जोडून विमानाची चाचणी उड्डाणे सुरू होतील व नंतर संपूर्ण फाल्कन विमान द सॉल्टला सोपवले जाईल.
दर महिन्याला दोन विमाने तयार करण्याची योजना असून त्यासाठी १.५० लाख चौरस फुटाचे हँगर उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यावर ६५० इंजिनियर्स विमान उत्पादन करतील. यासोबत राफेलचे सुटे भागसुद्धा तयार होऊन फ्रान्सला निर्यात होतील. मिहान-एसईझेडमधील डीआरएलचा हा प्रकल्प एक्झिक्युटिव्ह जेट विमाने व लढावू विमाने बनवणारा जगातील एकमेव कारखाना असेल अशी माहितीही एमएडीसीच्या सूत्रांनी दिली.