घराबाहेर पडताय... खबरदारी घ्या! वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2020 07:19 PM2020-06-08T19:19:59+5:302020-06-08T19:22:27+5:30
गेल्या अडीच महिन्यापासून असलेला लॉकडाऊन आता अनलॉक झाला आहे. राज्य शासनाने दिलेल्या सवलतीनंतर शहरात वर्दळ सुरू झाली आहे. मात्र नागपुरात कोरोना संपलेला नाही. यामुळे यापुढे घराबाहेर पडताना विशेष खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गेल्या अडीच महिन्यापासून असलेला लॉकडाऊन आता अनलॉक झाला आहे. राज्य शासनाने दिलेल्या सवलतीनंतर शहरात वर्दळ सुरू झाली आहे. मात्र नागपुरात कोरोना संपलेला नाही. यामुळे यापुढे घराबाहेर पडताना विशेष खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कोरोना आजाराची साखळी तोडण्यासाठी मुख्यत्वे मास्क, सॅनिटायझर, रुमाल सोबतच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे गरजेचे राहणार आहे. मेडिकलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांनी सांगितले की, बाधित व्यक्तीच्या शिंकण्यातून आणि खोकण्यातून जे तोंडावाटे थेंब बाहेर पडतात, त्यातून हा आजार पसरतो. हे उडालेले थेंब आजूबाजूला पृष्ठभागावर पडतात. त्याला स्पर्श झाला तर हाताला चिकटतात. ते हात जर वारंवार चेहरा, डोळे, नाक याला लावले गेले तर आजार पसरतो. सध्या कोरोनाच्या आजारावर औषध किंवा लस उपलब्ध नाही. लक्षणांवरून उपचार केले जातात. यामुळे ताप, सर्दी, कोरडा खोकला, श्वास घेण्यास त्रास होणे, तोंडाची चव जाणे, अशक्तपणा अशी लक्षणे आढळून येतात. कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी वारंवार हात साबण अथवा सॅनिटायझरने धुतले पाहिले. शिंकताना किंवा खोकताना नाक, तोंडावर रुमाल किंवा टिश्यूपेपर धरावा. याखेरीज, कोरोनाप्रमाणे अन्य पावसातील साथीच्या आजारांपासून बचाव करण्यासाठी योग्य आहार, उघड्यावरील पदार्थ न खाणे, दूषित पाणी-बर्फाचे सेवन टाळणे यावर भर दिला पाहिजे. जेणेकरून आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होईल, असेही ते म्हणाले.
हे लक्षात ठेवा
सार्वजनिक ठिकाणी कमीत कमी १ मीटर/ तीन फूट अंतर ठेवा
शांतता राखा, प्रवास करताना संयम राखा, गर्दी करू नका
दैनंदिन जीवनात वा शुभेच्छा देण्यासाठी हस्तांदोलन, गळाभेट टाळा
एकमेकांमध्ये नेहमी योग्य अंतर ठेवा
घरी पाहुणचार टाळा, इतरांच्या घरी जाणे टाळा
प्रवास करताना, घरी वा कार्यालयात वावरताना अनावश्यक गर्दी होऊ देऊ नका
आरोग्याची कुठलीही तक्रार भासल्यास आरोग्य केंद्रास किंवा महापालिकेच्या हेल्पलाईनवर संपर्क साधा.
मास्क वापरताना अशी घ्या काळजी
मास्कचे प्लिट खालील बाजूस उघडा व नाक, तोंड आणि हनुवटी झाकून जाईल अशा पद्धतीने लावावा. आपला चेहरा व मास्क यामध्ये अंतर असू नये, याची खात्री करा. मास्क खाली खेचू नका किंवा मानेला लटकत ठेवू नका, मास्कला सतत स्पर्श करू नका. मास्क काढण्यासाठी प्रथम दोरीचा खालचा भाग व त्यानंतर वरचा भाग काढा. दोरीच्या वरच्या बाजूचा वापर करून मास्क हाताळा. मास्क काढताना इतर पृष्ठभागाला स्पर्श करू नका.
मास्कला आपण अनवधनाने स्पर्श करतो. यामुळे हात वरचेवर स्वच्छ धुवा. एकदा वापरण्यायोग्य मास्क पुन्हा वापरू नका. काढल्यानंतर त्याची घरगुती ब्लिच सोल्युशनमध्ये भिजवून त्वरित बंद कचरापेटीत फेकून विल्हेवाट लावा.
आता प्रत्येकाला कोरोना वॉरिअर्स व्हावे लागेल
लॉकडाऊन शिथिल झाल्याने काही ठिकाणी गर्दी होण्याची व नियम न पाळले जाण्याची भीती आहे. आपल्याला कोरोनाला दूर ठेवायचे असेल तर प्रत्येकाला नियमांचे पालन करावे लागेल. घराबाहेर पडताना मास्क वापरणे, सॅनिटायझरचा वापर करणे, वारंवार हात धुणे, फिजिकल डिस्टन्सिंगचा वापर करावा लागेल. म्हणजेच प्रत्येकाला कोरोना वॉरिअर्स व्हावे लागेल.
डॉ. अविनाश गावंडे, वैद्यकीय अधीक्षक, मेडिकल