जुगारात रक्कम हरल्याने पोलिसांत नोंदवली खोटी तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:07 AM2021-06-19T04:07:13+5:302021-06-19T04:07:13+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - चाकूचा धाक दाखवून तिघांनी रक्कम लुटून नेल्याची तक्रार करणाऱ्या कलेक्शन एजंटची बनवाबनवी काही ...

False report lodged with police for losing money in gambling | जुगारात रक्कम हरल्याने पोलिसांत नोंदवली खोटी तक्रार

जुगारात रक्कम हरल्याने पोलिसांत नोंदवली खोटी तक्रार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - चाकूचा धाक दाखवून तिघांनी रक्कम लुटून नेल्याची तक्रार करणाऱ्या कलेक्शन एजंटची बनवाबनवी काही तासांतच उघड झाली. त्यामुळे आता न्यायालयातून परवानगी मिळवून पोलीस त्याच्यावर कारवाई करणार आहेत.

मनोज फकिरचंद मोंदेकर (वय ३२, रा. राणी दुर्गावती चाैक) असे खोटी तक्रार नोंदवणाऱ्याचे नाव आहे. तो एका चॉकलेटच्या वितरकाकडे कलेक्शनचे काम करतो. गुरुवारी दुपारी तो वाठोडा पोलीस ठाण्यात पोहचला. आपण दुपारी १.४५ च्या सुमारास वाठोड्यातील चांदमारी सिमेंट मार्गाने जात असताना पल्सरवर तीन आरोपी आले. पत्ता विचारण्याच्या बहाण्याने ते जवळ थांबले आणि आजूबाजूला कुणी नसल्याचे पाहून त्यांनी चाकूचा धाक दाखवून ७०,५०० रुपये हिसकावून नेले, अशी तक्रार मनोजने पोलिसांकडे नोंदवली. पोलिसांनी त्याच्या तक्रारीवरून लुटमारीचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर त्याने सांगितलेल्या घटनास्थळाजवळ त्याला नेले. तेथील आणि आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. मात्र, त्यात तशी कोणतीही घटना घडल्याचे चित्रण नव्हते. तो विसंगत माहिती देत असल्याचे लक्षात आल्याने पोलिसांना संशय आला. त्याच्यावर प्रश्नांची सरबत्ती करताच तो गोंधळला. अशी घटनाच घडली नाही, असे सांगून आपण जुगारात रक्कम हरल्यामुळे खोटी तक्रार नोंदवल्याचे त्याने पोलिसांकडे सांगितले.

अशा खोट्या तक्रारीच्या प्रकरणात न्यायालयातून परवानगी घेऊन पोलीस संबंधित व्यक्तीवर कारवाई करतात. ती प्रक्रिया पोलीस आता सुरू करणार आहेत.

---

ऑनलाईन डाव

मनोजला ऑनलाईन जुगार खेळण्याचे व्यसन आहे. तो तीन पत्तीच्या ऑनलाईन जुगारात रक्कम हरला. त्याने ही रक्कम त्याचा मित्र अतुल वाटकर याच्या अकाऊंटमध्ये जमा केल्याचे आणि त्यातून ती रक्कम डेबिट झाल्याचे मोबाईलच्या तपासणीतून उघड झाले. ज्यांच्याकडे काम करतो, तो वितरक ती रक्कम मागेल. त्यामुळे त्यांना काय सांगावे, असा त्याला प्रश्न पडला. त्यामुळे त्याने ही डावबाजी केली अन् बनावट तक्रार ठोकून दिली. मात्र, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय अढाव, तसेच वाठोड्याच्या ठाणेदार आशालता खापरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मनोजची बनवाबवनी उघड केली.

---

Web Title: False report lodged with police for losing money in gambling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.