गुळगुळीत रस्त्यांवर जीवघेणे खड्डे

By admin | Published: July 7, 2016 02:56 AM2016-07-07T02:56:11+5:302016-07-07T02:56:11+5:30

उपराजधानीतील मुख्य रस्ते अलीकडेच गुळगुळीत करण्यात आले. तरीसुद्धा काही प्रमुख रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत.

Falter pits in smooth roads | गुळगुळीत रस्त्यांवर जीवघेणे खड्डे

गुळगुळीत रस्त्यांवर जीवघेणे खड्डे

Next

अपघाताला निमंत्रण : मनपा व नासुप्रने लक्ष द्यावे
नागपूर : उपराजधानीतील मुख्य रस्ते अलीकडेच गुळगुळीत करण्यात आले. तरीसुद्धा काही प्रमुख रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. हे खड्डे वाहनचालकांसाठी जीवघेणे ठरत आहेत. पावसाळ्यात या खड्ड्यात पाणी साचते. त्यामुळे वाहनचालकांना हे खड्डे दिसत नाहीत. अचानक या खड्ड्यातून दुचाकी गेल्यास वाहनचालकांचा तोल जाऊन गंभीर अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ‘लोकमत’ने शहरातील काही प्रमुख मार्गांवरील खड्ड्यांची पाहणी केली असता हे गंभीर वास्तव पुढे आले. महापालिका व नागपूर सुधार प्रन्यासने या खड्ड्यांची डागडुजी करून वाहनचालकांना दिलासा देणे गरजेचे आहे.

माऊंट रोड : सदरच्या माऊंट रोडकडून नासुप्र कार्यालयाकडे जाताना डाव्या बाजूला एक मोठा खड्डा आहे. खड्ड्यातही पाणी साचत असल्यामुळे वाहनचालकांचे दुर्लक्ष होऊन अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. या परिसरात अनेक व्यापारी प्रतिष्ठाने असून ग्राहकांची येथे नेहमीच वर्दळ असते. त्यामुळे या खड्ड्याची त्वरित डागडुजी करण्याची मागणी आहे.
इमामवाडा बसस्थानक : गणेशपेठकडून इमामवाडा बसस्थानकाकडे येणाऱ्या रस्त्यावर दोन फुटाचा मोठा खड्डा पडला आहे. या खड्ड्यात अनेक दुचाकीस्वार अपघातग्रस्त झाल्याची माहिती तेथील वाहनचालकांनी दिली. या खड्ड्यात पाणी साचल्यामुळे येथे खड्डा असल्याची पुसटशी कल्पनाही नागरिकांना येत नसल्यामुळे येथे नेहमीच अपघात होत असल्याची माहिती आहे.
कस्तूरचंद पार्क : कस्तूरचंद पार्ककडून रेल्वेस्थानकाकडे जाताना सिग्नलच्या आधी रस्त्यावर एक मोठा खड्डा पडला आहे. हा रस्ता अतिशय वर्दळीचा आहे. येथे अनेकदा वाहनचालकांचा तोल जातो. परंतु तरीसुद्धा हा खड्डा बुजविण्याची तसदी प्रशासनाने घेतलेली दिसत नाही.
एलआयसी चौक : एलआयसी चौकातून सदरकडे जाणाऱ्या रस्त्यावरही एक अरुंद आकाराचा मोठा खड्डा पडला आहे. पाऊस आल्यानंतर हा खड्डा तुडुंब पाण्याने भरलेला असतो. येथे खड्डा असल्याचे वाहनचालकांना माहीत नसल्यामुळे त्यांचे वाहन अचानक या खड्ड्यात जाऊन वाहनचालकांचा तोल जातो. हा खड्डाही वाहनचालकांसाठी जीवघेणा ठरत आहे.
 

Web Title: Falter pits in smooth roads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.