कोविड रुग्णसेवा देणाऱ्यांचे कुटुंब धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:07 AM2021-04-06T04:07:05+5:302021-04-06T04:07:05+5:30
नागपूर : कोरोनाचा कहर वाढत असताना डॉक्टरांपासून ते परिचारिका व कर्मचारी अविरत रुग्णसेवा देत आहेत. पूर्वी या आरोग्य सेवकांसाठी ...
नागपूर : कोरोनाचा कहर वाढत असताना डॉक्टरांपासून ते परिचारिका व कर्मचारी अविरत रुग्णसेवा देत आहेत. पूर्वी या आरोग्य सेवकांसाठी आधी १४ दिवस आणि नंतर पाच दिवस क्वारंटाइनची व्यवस्था करण्यात आली होती; परंतु आता अशी कुठलीच सोय नाही. दररोज रुग्णसेवा दिल्यानंतर हे आरोग्य कर्मचारी आपल्या घरी जातात. परिणामी त्यांच्या कुटुंबीयांची आरोग्य सुरक्षा धोक्यात आली आहे. यातील अनेकांच्या घरी लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यांच्या आरोग्य सुरक्षेचे काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने चिंतेचे वातावरण आहे. सध्या मेयो, मेडिकलमधील बेड फुल्ल झाले आहेत. कॅज्युअल्टीमध्ये एका बेडवर दोन रुग्णांवर उपचार करण्याची वेळ आली आहे. कोविड रुग्णसेवेत असणाऱ्या डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण प्रचंड वाढला आहे. शिवाय, रुग्णालयातून घरी गेल्यावर आपल्यामुळे घरातील सदस्यांना संसर्ग होणार नाही ना, ही भीती त्यांच्यामध्ये आहे. यामुळे बहुसंख्य आरोग्य कर्मचारी रुग्णालयातून घरी गेल्यानंतर स्वत:ला कुटुंबीयांपासून दूर ठेवत क्वारंटाइन होत आहेत. तरीही त्यांच्या घरातील सदस्यांना धोका आहेच.
-मेयोमध्ये ६४३, तर मेडिकलमध्ये ९७७ आरोग्य कर्मचाऱ्यांची कोविड रुग्णसेवा
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) रोज जवळपास ६४३ आरोग्य कर्मचारी कोविड रुग्णांच्या सेवेत असतात. यात तीन कंत्राटी कंपन्यांचे मिळून १६५ कर्मचारी, १२० कायमस्वरूपी व ५८ कंत्राटी परिचारिका व जवळपास ३००वर डॉक्टर कोविड रुग्णांना तीन पाळ्यांत रुग्णसेवा देत आहेत, तर मेडिकलमध्ये रोज साधारण ९७७ आरोग्य कर्मचारी कोविड रुग्णसेवेत असतात. यात कंत्राटी कंपनीचे जवळपास ३३२ कर्मचारी, २२० कायमस्वरूपी, २५ कंत्राटी परिचारिका, जवळपास ४००वर डॉक्टर सेवा देत आहेत. कंत्राटी वगळता इतर सर्व आरोग्य सेवकांना सात दिवस ड्युटी व तीन दिवस सुटी दिली जाते. त्यानंतर एक आठवडा नॉनकोविड रुग्णसेवा दिली जाते आणि पुन्हा कोविड रुग्णसेवा, असे चक्राकार पद्धतीने ड्युटी लावली जाते; परंतु कोविड रुग्णसेवेत असताना ते सरळ घरी जात असल्याने त्यांच्याकडून संसर्ग पसरण्याचा धोका असतो. विशेषत: त्यांचे कुटुंब मोठ्या भीतीच्या वातावरणात दिवस काढत असल्याचे काही परिचारिका व डॉक्टरांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
-कंत्राटी कर्मचाऱ्यांना कोविड ड्युटीनंतर सुटी नाहीच
कोविड वॉर्डातील सर्व स्वच्छतेच्या कामापासून ते मृतदेह बॅगमध्ये भरून शवविच्छेदन गृहात ठेवण्याचे काम करावे लागते. हे कर्मचारी कोविड रुग्णांच्या खूप जवळून संपर्कात येतात; परंतु त्यांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेची जबाबदारी वाऱ्यावर आहे. हाताला काम नसल्याने फार कमी मानधनावर हे कर्मचारी काम करीत आहेत. याशिवाय, सातही दिवस त्यांची कोविड वॉर्डात ड्युटी लावली जात आहे. त्यांना सात दिवस ड्युटी व तीन दिवस पगारी सुटी ही अट लागू नाही. यातील बहुसंख्य कर्मचारी हे भाड्याच्या घरात राहतात. त्यांच्याकडे क्वारंटाइन होण्यासाठी स्वतंत्र खोली नसल्याने यांचे कुटुंब अधिक धोक्यात आले आहे.
मेडिकलमध्ये कोरोनाबाधितांची संख्या : ६४८
मेयोमध्ये कोरोनाबाधितांची संख्या : ५२५
(४ एप्रिलनुसार)