कौटुंबिक कलह मुलांसाठी घातक : अनघा राजे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2020 10:24 PM2020-02-13T22:24:51+5:302020-02-13T22:27:06+5:30
कौटुंबिक कलह मुलांसाठी अतिशय घातक ठरतो. कौटुंबिक कलहामुळे मुले प्रेमापासून वंचित होतात. त्याचा मुलांच्या मानसिकता व गुणवत्तेवर परिणाम होतो, असे मानसोपचारतज्ज्ञ अनघा राजे यांनी ‘कौटुंबिक कलहाचा नात्यावर परिणाम’ विषयावरील चर्चासत्रात सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कौटुंबिक कलह मुलांसाठी अतिशय घातक ठरतो. कौटुंबिक कलहामुळे मुले प्रेमापासून वंचित होतात. त्याचा मुलांच्या मानसिकता व गुणवत्तेवर परिणाम होतो, असे मानसोपचारतज्ज्ञ अनघा राजे यांनी ‘कौटुंबिक कलहाचा नात्यावर परिणाम’ विषयावरील चर्चासत्रात सांगितले.
हे चर्चासत्र महाराष्ट्र राज्य कुटुंब न्यायालय समुपदेशक संघटना व कुटुंब न्यायालय वकील संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने कुटुंब न्यायालयात आयोजित करण्यात आले होते. चर्चासत्रात राजे यांच्यासह सेवानिवृत्त न्यायाधीश भावना ठाकर, वकील संघटनेचे अध्यक्ष अॅड. श्याम आंभोरे, विवाह समुपदेशक लक्ष्मीकांत कामळजकर यांचा समावेश होता.
संयुक्त कुटुंब पद्धती मोडित निघून विभक्त कुटुंब पद्धती वाढीस लागली आहे. विभक्त कुटुंबातील पती-पत्नी नोकरी करीत असल्यास मुलांकडे दुर्लक्ष होते. अन्य विविध कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण करणे कठीण जाते. त्यामुळे कलह निर्माण होतो, असे मत ठाकर यांनी व्यक्त केले. कौटुंबिक कलहाचा व्यक्तीच्या वैयक्तिक व व्यावसायिक जीवनावर परिणाम होतो, असे अॅड. आंभोरे यांनी तर, कौटुंबिक कलहामुळे नैराश्य, एकटेपणा व व्यसनाधीनता वाढते, असे कामळजकर यांनी सांगितले. याप्रसंगी प्रधान न्यायाधीश मंगला ठाकरे, न्या. विश्वास पाठक, न्या. प्रशांत अग्निहोत्री प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. अॅड. रश्मी खापर्डे यांनी संचालन केले तर, विवाह समुपदेशक राजेंद्रकुमार कोतवाल यांनी आभार मानले.