कुटुंब दिन विशेष; हादरलो, पण निष्काळजीपणा होऊ दिला नाही; म्हणून जिंकलो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 09:20 AM2021-05-15T09:20:39+5:302021-05-15T09:21:53+5:30
Nagpur News कुटुंबातील बहुतेक सदस्य संक्रमित होण्याची दहशत काय असते, ते आम्ही प्रत्यक्ष अनुभवले आहे. आम्ही सर्व हादरून गेलो होतो. मात्र, याही परिस्थितीत सकारात्मक विचार आणि वेगवेगळे राहून एकमेकांची सोबत सोडली नाही. घाबरलो होतो; पण निष्काळजीपणा होऊ दिला नाही.
निशांत वानखेडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाने निर्माण झालेली सभोवतालची भीती पाहत होतो; पण आमच्याही कुटुंबावर हे संकट ओढवेल, असे वाटले नव्हते. कुटुंबातील बहुतेक सदस्य संक्रमित होण्याची दहशत काय असते, ते आम्ही प्रत्यक्ष अनुभवले आहे. आम्ही सर्व हादरून गेलो होतो. मात्र, याही परिस्थितीत सकारात्मक विचार आणि वेगवेगळे राहून एकमेकांची सोबत सोडली नाही. घाबरलो होतो; पण निष्काळजीपणा होऊ दिला नाही. म्हणूनच या जीवघेण्या आजारावर मात करू शकलो.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमधून सेवानिवृत्त आणि कथ्थक नृत्य शिक्षक भूपेश मेहर यांनी ‘लोकमत’शी त्या वेळचा थरारक अनुभव वर्णन केला. १८ मार्च रोजी ते आणि त्यांची पत्नी राजेश्री मेहर मुलाबरोबर लसीकरणासाठी गेले होते. त्यावेळी मुलाला अस्वस्थ वाटत होते. त्याला कोरोना टेस्ट करण्याचा सल्ला दिला. सायंकाळी त्याची टेस्ट पॉझिटिव्ह आली. त्यामुळे कुटुंबातील इतर सदस्यांच्याही टेस्ट करण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी मी, ८४ वर्षीय वडील, सून, नातू व मुलगी रिद्धीचीही टेस्ट केली. यातून वडील, पत्नी व मुलगी वगळता सर्व पाॅझिटिव्ह आले. हा पहिला धक्का हाेता. त्यानंतर रेल्वेत नाेकरी करणारा लहान भाऊ आणि त्याची पत्नी, तसेच डाॅक्टर असलेल्या मधल्या भावाची पत्नीही पाॅझिटिव्ह निघाली. आमच्या पायाखालची जमीन सरकली हाेती. आम्हा सर्वांची सेवा करणारी माझी मुलगी रिद्धी आणि वडीलही आठ दिवसांनी पाॅझिटिव्ह आले. त्यामुळे भीती आणखी वाढली.
आम्ही घाबरलाे हाेताे; पण धीर खचू दिला नाही आणि निष्काळजीपणाही हाेऊ दिला नाही. आमचे तिन्ही भावांचे कुटुंब तीन माळ्यावर राहते. संक्रमित सदस्यांनी वेगवेगळ्या खाेल्यांमध्ये स्वत:ला बंद करून घेतले. नियमित औषध घेण्यापासून वाफ घेणे, हळद टाकून पाणी घेणे, नियमित व्यायाम, याेगासने व सकाळी उठून ऊन घेण्यापर्यंतचे सर्व उपाय केले. कुणालाही बीपी, शुगरसारखे आजार नसणे आमच्यासाठी सकारात्मक ठरले. मनातील सकारात्मकतेमुळेच कुणालाही रुग्णालयात भरती न करता सर्व सदस्य सुखरूपपणे या आजारातून बाहेर पडलाे. ते दिवस खरेच कठीण हाेते. त्यामुळे सर्वांनी काळजी घेणे, टेस्ट करण्यात व औषधाेपचार करण्यात निष्काळजीपणा न करणे आणि सकारात्मकता बाळगण्याचे आवाहन भूपेश मेहर यांनी केले.
पत्नी ठरली वाॅरियर
या संपूर्ण काळात माझी पत्नी राजेश्री आणि मधला भाऊ हे दोघे संक्रमित झाले नाहीत. तिनेच सर्वांच्या जेवण खाण्यापासून औषधापर्यंतची जबाबदारी हिमतीने सांभाळली. तिच्यामुळे आमची सर्वांची व्यवस्था हाेऊ शकली. भावाने औषधांची काळजी घेतली. ती आणि भाऊ खरे वाॅरियर ठरले.