कोरोनाकाळात विस्कटली संसाराची घडी; घटस्फोटासाठी न्यायालयात धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 07:00 AM2021-04-22T07:00:00+5:302021-04-22T07:00:15+5:30

Nagpur news जगामध्ये भारतीय विवाह संस्था सर्वांत बळकट मानली जाते; पण कोरोना काळात या संस्थेला तडे जात आहेत. गेल्या वर्षीपासून कौटुंबिक वाद वाढले आहेत. परिस्थिती हाताबाहेर गेलेले पती-पत्नी घटस्फोटासाठी कुटुंब न्यायालयात धाव घेत आहेत.

Family disturbed during the Corona period; Run to court for divorce | कोरोनाकाळात विस्कटली संसाराची घडी; घटस्फोटासाठी न्यायालयात धाव

कोरोनाकाळात विस्कटली संसाराची घडी; घटस्फोटासाठी न्यायालयात धाव

googlenewsNext
ठळक मुद्देकौटुंबिक वाद वाढले 

लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : जगामध्ये भारतीय विवाह संस्था सर्वांत बळकट मानली जाते; पण कोरोना काळात या संस्थेला तडे जात आहेत. गेल्या वर्षीपासून कौटुंबिक वाद वाढले आहेत. परिस्थिती हाताबाहेर गेलेले पती-पत्नी घटस्फोटासाठी कुटुंब न्यायालयात धाव घेत आहेत.

कुटुंब न्यायालय विधिज्ञ संघटनेचे अध्यक्ष ॲड. श्याम अंभोरे यांनी या माहितीला दुजोरा दिला. कोरोनामुळे जिल्ह्यात विविध निर्बंध लागू करण्यात आले आहेत. परिणामी, अनेक जण बेरोजगार झाले आहेत. अनेकांचे वेतन कमी झाले आहे. त्यातून आर्थिक संकट कोसळले असून, त्याचा परिणाम कौटुंबिक शांततेवर झाला आहे. याशिवाय अनेक जण घरून काम करीत आहेत तर, काही काम बंद असल्यामुळे घरीच दिवस घालवत आहेत. ही बाबदेखील पती-पत्नीमध्ये दुरावा निर्माण करीत आहे. मुलांचा सांभाळ, घरातील कामे, कुटुंबातील ज्येष्ठांची देखभाल, आर्थिक ताळमेळ साधण्यात अपयश, खाण्या-पिण्याविषयी असमाधान अशा विविध कारणांवरून पती-पत्नीमध्ये भांडणे होत आहेत. त्यामुळे घटस्फोटासाठी न्यायालयात येणाऱ्या पती-पत्नीची संख्या गेल्या वर्षीपासून वाढली आहे, असे ॲड. अंभोरे यांनी सांगितले.

यामुळे होतात संसार उद्ध्वस्त

स्वत:बद्दलचा अहंकार, एकमेकांना कमी लेखणे, जोडीदाराने आपल्या मनासारखे वागावे असा आग्रह धरणे, एकमेकांच्या कामात हस्तक्षेप करणे, सहनशीलतेचा अभाव, विभक्त कुटुंब पद्धती, एकमेकांना पुरेसा वेळ देण्यास टाळाटाळ, विवाहबाह्य संबंध, शारीरिक-मानसिक छळ, एकमेकांच्या नातेवाइकांचा अनादर करणे इत्यादी बाबी संसार उद्ध्वस्त करण्यास कारणीभूत ठरत आहेत.

छळामुळे तोडले नाते

अजनी येथील एका पत्नीने सततच्या छळाला कंटाळून पतीसोबतचे वैवाहिक संबंध तोडले. पती एका खासगी कंपनीत काम करतो. कंपनीने कोरोनामुळे त्याला घरून काम करण्यास सांगितले होते. त्यामुळे तो दिवस-रात्र घरीच राहत होता. दरम्यान, तापट स्वभावामुळे तो पत्नीचा कोणत्या ना कोणत्या कारणावरून छळ करीत होता. पत्नीने बरेच दिवस छळ सहन केला; परंतु छळ असह्य झाल्यानंतर तिने घटस्फोट घेतला.

मोबाइलच्या वेडामुळे घटस्फोट

पत्नी मोबाइलच्या आहारी गेली असल्याने आणि वारंवार समजावल्यानंतरही तिने स्वत:च्या वागण्यात बदल न केल्यामुळे एका पतीने घटस्फोट घेतला. संबंधित पती व्यावसायिक असून, कोरोनामुळे तो सध्या बराच वेळ घरी घालवीत आहे. दरम्यान, त्याला पत्नीचे मोबाइल वेड खटकायला लागले. त्यावरून भांडणे वाढली. पत्नी माघार घेण्यास तयार नव्हती. ती पतीचा अनादर करीत होती. करिता, पतीने विवाह संबंध संपवले.

एकमेकांना समजून घ्यावे

न्यायालयीन प्रक्रियेत थेट विभक्त होण्यापूर्वी एकमेकांना समजून घेण्यास वेळ दिला जातो. या वेळेत पती-पत्नीने भांडणांच्या कारणांचा विचार करावा. भांडणाची ८० टक्के कारणे अगदीच क्षुल्लक असतात. त्यामुळे जवळच्या व्यक्तीशी चर्चा करून वाद संपवावा. सध्या पुरुषांसोबत स्त्रियाही काम करणाऱ्या आहेत. त्यामुळे एकमेकांच्या कामाचे स्वरूप समजावे लागेल. महिलांनीही कमावत्या पुरुषावर असलेला दबाव लक्षात घेऊन नियोजन करावे. एकमेकांच्या भावना समजून घ्याव्यात. शक्यतो कामातही सहकार्याची भूमिका घ्यावी. मित्र आणि सोशल कनेक्शन कायम ठेवावे.

- डॉ. आभा बंग, मानसोपचार तज्ज्ञ.

Web Title: Family disturbed during the Corona period; Run to court for divorce

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.