ओव्हरटेकच्या नादात कुटुंब संपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:08 AM2021-01-09T04:08:16+5:302021-01-09T04:08:16+5:30
नागपूर : अमरावती मार्गावर धामणा येथे आई-वडील आणि मुलाचा ओव्हरटेकमुळे करुण अंत झाल्याचा अंदाज आहे. तिघा जणांचा मृत्यू झाल्यामुळे ...
नागपूर : अमरावती मार्गावर धामणा येथे आई-वडील आणि मुलाचा ओव्हरटेकमुळे करुण अंत झाल्याचा अंदाज आहे. तिघा जणांचा मृत्यू झाल्यामुळे उमरेड मार्गावरील आदर्शनगर परिसरातील नागरिक हळहळ व्यक्त करीत आहेत.
गुरुवारी दुपारी ३.३० वाजता हिंगणाच्या धामणा येथे अनियंत्रित कारची ट्रकला धडक लागून शुभम बाबुराव भुरे (२८) त्याचे वडील डॉ. बाबुराव भुरे (६४) आणि आई-वनश्री भुरे (५२) यांचा मृत्यू झाला. भुरे परिवार मूळचा कुही येथील रहिवासी आहे. डॉ. बाबुराव भुरे आरोग्य विभागातून सेवानिवृत्त झाले आहेत. ते बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूरमध्ये वैद्यकीय अधिकारी होते.
सेवानिवृत्तीनंतर ते नागपूरला स्थायिक झाले. डॉ. भुरे यांच्या कुटुंबात मुलगा शुभम शिवाय मुलगी प्रियांका मौंदेकर आणि स्वीटी आहे. प्रियांका नागपुरात राहते. स्वीटी डॉक्टर असून ती कुवैतमध्ये राहते. डॉ. भुरे यांचे मलकापूरला घर आहे. त्यामुळे ते मलकापूरला ये-जा करतात. शुभम सॉफ्टवेअर इंजिनिअर होते. त्याला आठ महिन्यांपूर्वी पुण्यात नोकरी लागली होती. कोरोनामुळे त्याला वर्क फ्रॉम होमची सुविधा मिळाली होती. त्यामुळे भुरे दाम्पत्य १५ दिवसांपूर्वी मुलासोबत मलकापूरला गेले होते. शुभमला दोन दिवसात पुण्याला जायचे होते. त्याने आईवडिलांना नागपूरला सोडून पुण्याला परतण्याचा बेत आखला होता. त्यासाठी तो आईवडिलांसोबत गुरुवारी सकाळी कारने नागपूरला येत होता. दरम्यान, तिघेही अपघातात मृत्यू पावले. घटनास्थळाची पाहणी केल्यावर शुभमने अवजड वाहनाला ओव्हरटेक करताना ही घटना घडली असल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. ट्रकला त्याच्या चालकाने रस्त्याच्या कडेला उभे केले होते. रस्त्यावर ये-जा करण्यासाठी पुरेशी जागा होती. परंतु ट्रकचालकाने अपघाताच्या शक्यतेकडे दुर्लक्ष करून कोणत्याही संकेताचा वापर केला नव्हता. शुभमने समोर चालत असलेल्या अवजड वाहनाला डाव्या बाजूने ओव्हरटेक केल्याची शंका आहे. अचानक समोर ट्रक पाहून शुभमचे कारवरील नियंत्रण सुटले. कार ट्रकच्या मागील भागात फसली. यामुळे कार चालवीत असलेला शुभम आणि त्याच्या बाजूला बसलेले डॉ. भुरे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच हिंगणा पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर त्यांनी दोघांना कारमधून बाहेर काढले. त्यावेळी शुभमची आई तनुश्री श्वास घेत होती. परंतु गंभीर जखमी झाल्यामुळे रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. हा अपघात ओव्हरटेकमुळे घडल्याची शंका असली तरी पोलिसांनी शुभम आणि ट्रकचालक दोघांनाही आरोपी बनविले आहे. शुक्रवारी सायंकाळी तिघांवर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
............
ओव्हरटेक-ओव्हरस्पीड जीवघेणा
महामार्गावर बहुतांश अपघात ओव्हरटेक किंवा ओव्हरस्पीडमुळे होतात. त्यानंतरही वाहनचालक खबरदारी घेत नाहीत. अवजड वाहनांचे चालक सहजासहजी साईड देत नाहीत. पुढे निघून जाण्यासाठी गडबडीत लहान वाहनांचे चालक चूक करतात. गुरुवारी तीन तासाच्या आत झालेल्या दोन अपघातात पाच नागरिकांना जीव गमवावा लागला. पारशिवनीत ट्रॅव्हल्सने बाईकस्वार यश भालेराव (१३) आणि अतुल पनवेलकर (१४) यांना चिरडले. त्यांचा लकी नावाचा मित्र गंभीर जखमी झाला. रस्ते अपघातात नागरिकांचा जीव जात असल्यामुळे ठोस पावले उचलण्याची गरज आहे.
............