दिव्यांगजनासह परिवाराचे कोरोना काळात सक्षमीकरण गरजेचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2020 07:47 PM2020-06-04T19:47:12+5:302020-06-04T19:47:56+5:30
कोविड १९ च्य प्रकोपामुळे सामान्यजन जिथे हवालदील झाले आहेत तिथे दिव्यांगजन व त्याचे कुटुंबिय यांना अधिक काळजी घेण्याची गरज आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: कोविड १९ च्य प्रकोपामुळे सामान्यजन जिथे हवालदील झाले आहेत तिथे दिव्यांगजन व त्याचे कुटुंबिय यांना अधिक काळजी घेण्याची गरज आहे. या काळजीमध्ये त्यांची आरोग्य, सामाजिक, आर्थिक, मानसिक अशा सर्व पातळ्यावरील देखरेख व सक्षमीकरण अपेक्षित ठरते.
गेल्या दोन-अडीच महिन्यापासून सगळेजण घरात बंदिस्त आहेत. अशा परिस्थितीत घरातील सदस्यांमध्ये चिंता, भय, क्रोध, अपराधीपण आदी भावना उत्पन्न होणे स्वाभाविक आहे. त्याचसोबत आत्मविश्वास डळमळणे, निर्णयक्षमता हरवणे याही बाबी संभवात. अशात जर घरात एखादे दिव्यांग मूल असेल तर या भावनांचा उद्रेक तीव्रतेने होण्याची शक्यता असते. हे सर्व टाळण्यासाठी व त्यावर नियंत्रण राखण्यासाठी त्या कुटुंबाचे सक्षमीकरण करणे गरजेचे ठरते.
यात स्वच्छता आणि आरोग्य हे प्रथम स्थानी येते. सामान्यांच्या तुलनेत दिव्यांगजनांना कोरोना व इतर संक्रमणांचा धोका अधिक होऊ शकतो. त्यासाठी काही उपाय करणे आवश्यक ठरते. यात नियमित मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतर जपणे, बाहेरच्या वस्तूला स्पर्श केल्यानंतर हात स्वच्छ धुणे, तोंडाला हात लावण्याआधी तो स्वच्छ धुणे, शौच केल्यानंतर हात स्वच्छ धुणे, दोन वेळेस स्नान करणे, नखे नियमित कापणे, दररोज ताजे घरचे अन्न घेणे, ताजी फळे व हिरव्या पालेभाज्या स्वच्छ धुणे याचा समावेश होतो. तसेच दररोज भरपूर पाणी पिणे, पुरेशी झोप घेणे हेही महत्त्वाचे ठरते. घराची स्वच्छता राखणे हेही अतिशय महत्त्वाचे आहे.
शासनानेही दिव्यांगजन, शेतकरी, लघु-मध्यम वा कुटीर उद्योगासाठी मदत करणे गरजेचे आहे. निराधार पेन्शनसारख्या योजनेतून मिळणाऱ्या रकमेत वाढ करणे, तीव्र दिव्यांगजन व बहुविकलांग व्यक्तींना घरपोच जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणे आवश्यक ठरते. दिव्यांगांच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी आॅनलाईन शिक्षण, वेबिनारच्या माध्यमांचा वापर करणे योग्य ठरते. या सर्वासोबत मार्गदर्शन व समुदेशन याचेही महत्त्व आहेच.
या संकटकाळात वरील उपायांचा अवलंब करून दिव्यांगजन व त्यांच्या परिवाराला प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रित्या मदत दिली जाऊ शकते.