प्रसिद्ध उद्योजक नानासाहेब वाघमारे यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 12:13 AM2017-10-30T00:13:48+5:302017-10-30T00:14:10+5:30
उद्योगाच्या क्षेत्रामध्ये नागपूरकरांचे भूषण ठरलेल्या आणि भारतात मसाले उद्योगामध्ये अग्रस्थानी असलेल्या वाघमारे मसाले उद्योग समूहाचे संस्थापक कृष्णराव काशीनाथपंत उपाख्य नानासाहेब वाघमारे यांचे रविवारी निधन झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उद्योगाच्या क्षेत्रामध्ये नागपूरकरांचे भूषण ठरलेल्या आणि भारतात मसाले उद्योगामध्ये अग्रस्थानी असलेल्या वाघमारे मसाले उद्योग समूहाचे संस्थापक कृष्णराव काशीनाथपंत उपाख्य नानासाहेब वाघमारे यांचे रविवारी निधन झाले. ते ९४ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात त्र्यंबक, प्रकाश, उमेश व राजेश ही मुले, रंजना, वंदना व कल्पना या तीन मुली आणि बराच आप्तपरिवार आहे.
औद्योगिक क्षेत्रात ज्या ज्या वैदर्भीय माणसांनी उत्तुंग भरारी घेतली त्यामध्ये नानासाहेबांनी सुरू केलेल्या वाघमारे मसाले उद्योग समूहाचे नाव आदराने घेतले जाते. २७ आॅगस्ट १९२४ ला जन्मलेल्या नानासाहेबांनी सुरुवातीचा काही काळ पत्रकारितेत कार्य केले. मात्र त्यांचा अधिक कल व्यवसायाकडेच होता. ते राष्टÑीय स्वयंसेवक संघाचे निष्ठावान स्वयंसेवक होते. स्वत:च्या पायावर उभे राहून व्यवसाय सुरू करावा या ध्येयाने प्रेरित होऊन नानासाहेबांनी १९६५ मध्ये वाघमारे मसाल्यांची मुहूर्तमेढ रोवली. त्याअंतर्गत महाल भागात त्यांनी स्वत:चे दुकान सुरू केले. मसाल्यांची शुद्धता आणि गुणवत्ता त्यांनी नेहमीच जोपासली. त्यामुळेच वाघमारे मसाले उत्पादनाचे नाव विदर्भातच नाही तर संपूर्ण महाराष्टÑ आणि देशात लोकप्रिय ठरले आणि आजही ही लोकप्रियता कायम आहे. नानासाहेब वाघमारे यांचा देवनाथ पीठाचे जितेंद्रनाथ महाराज यांच्याशी निकटचा संबंध होता. नागपूर चिल्लर किराणा व्यापारी संघाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी कार्य केले. शिवाय गुरव समाजाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले. ग्राहक पंचायतीच्या माध्यमातूनही त्यांनी अनेक वर्षे औद्योगिक क्षेत्रात कार्य केले. त्यांच्या निधनाची बातमी कळताच राजकीय, सामाजिक आणि उद्योग क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी घरी जाऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या पार्थिवावर गंगाबाई घाट येथे रविवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सामाजिक, राजकीय आणि उद्योग क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. नानासाहेबांच्या निधनाने उद्योग आणि सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाल्याची प्रतिक्रिया मान्यवरांनी व्यक्त केली.