प्रसिद्ध न्यूरो सर्जन व कवी लोकेंद्र सिंह म्हणतात , लोकांची मानसिकताच खराब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 11:16 PM2018-06-20T23:16:29+5:302018-06-20T23:16:44+5:30
लोकांचे डोके नाही तर मानसिकताच खराब आहे. हे तर एका हार्डवेअरसारखे आहे. त्यात आपण जसे सॉफ्टवेअर अपलोड केले, तसे परिणाम मिळतील. आमचा देश महान आहे, परंतु नागरिकांमध्ये महानता नाही. आम्ही आमचे नैतिक कर्तव्य आणि मूल्य जाणून घेत नाही. भ्रष्टाचार, गुन्हेगारी हे खराब मानसिकतेचे प्रतीक असल्याचे मत सुप्रसिद्ध न्यूरो सर्जन व कवी लोकेंद्र सिंह ‘सरजन’ यांनी व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लोकांचे डोके नाही तर मानसिकताच खराब आहे. हे तर एका हार्डवेअरसारखे आहे. त्यात आपण जसे सॉफ्टवेअर अपलोड केले, तसे परिणाम मिळतील. आमचा देश महान आहे, परंतु नागरिकांमध्ये महानता नाही. आम्ही आमचे नैतिक कर्तव्य आणि मूल्य जाणून घेत नाही. भ्रष्टाचार, गुन्हेगारी हे खराब मानसिकतेचे प्रतीक असल्याचे मत सुप्रसिद्ध न्यूरो सर्जन व कवी लोकेंद्र सिंह ‘सरजन’ यांनी व्यक्त केले.
बुधवारी सायंकाळी झाशी राणी चौकातील विदर्भ हिंदी साहित्य संमेलनाच्या ‘संवाद’ कार्यक्रमात ते बोलत होते. डॉ. सिंह यांचा जीवन प्रवास, संघर्ष, यश आणि साहित्याबाबत डॉ. सागर खादीवाला यांनी संवाद साधला. आपल्या जीवन प्रवासाबाबत ते म्हणाले, मथुरेत माझा जन्म झाला. कुटुंब जयपूरमध्ये स्थायिक झाले. येथूनच शालेय, महाविद्यालयीन शिक्षण घेतले. त्यानंतर न्यूरो सर्जनच्या रूपाने काही वेळ काम केले. वडिलांच्या आदेशामुळे मी ते सोडून दुसऱ्या क्षेत्रात जाण्याचा विचार केला. परंतु मला डोक्याच्या उपचारात आवड निर्माण झाली. चंदीगडवरून न्यूरो सर्जरीचा अभ्यासक्रम पूर्ण केला. दरम्यान, प्रोफेसरने मला नागपुरात डॉ. टावरींकडे पाठविले. या शहराच्या आत्मियतेने मला परत जाऊ दिले नाही. कार्यक्रमात डॉ. सिंह यांच्या पत्नी मधुबाला सिंह यांनीही वैवाहिक जीवनाच्या सुरुवातीचा काळ गंमतीशीर मांडला. चर्चेपूर्वी साहित्यिक मधुप पांडेय यांनी डॉ. सिंह यांचा शाल-श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला.
सर्जन ते सरजनचा प्रवास
डॉ. खादीवाला यांच्या साहित्य क्षेत्रात पदार्पणाबाबतच्या प्रश्नावर ते म्हणाले, कॉलेजमध्ये पॅथालॉजी विभागाच्या निवडणुकीदरम्यान एक हास्य कविता लिहिली. ती लोकांना खूप आवडली. त्यानंतर गंभीरपणे मी ‘मस्तिष्क और मेरे बीच संवाद’च्या कल्पनेला कवितेत बदलविले. आयएमएच्या मंचावर पहिल्यांदा सादरीकरण केले. त्यानंतर हा छंद जडला आणि आज ६५० पेक्षा अधिक कविता लिहिल्या. सर्जन सोबत साहित्याचे सृजन करता करता मी सरजन झालो.
जिंकणे-हरण्याचा निकाल त्वरित
सर्जन म्हणून काम करतानाच्या संघर्षाबाबत ते म्हणाले, ‘मी औषध देतो, तो (ईश्वर) रक्षा करतो.’ डॉक्टरला नेहमी रुग्ण लवकर बरा व्हावा, असे वाटते. डॉक्टरच्या व्यवसायावर चुकीचे आरोप होतात. या व्यवसायात जिंकण्याचा आणि हरण्याचा निर्णय त्वरित होतो. काही डॉक्टरांनी यास व्यवसायाचे रूप दिले आहे. परंतु त्यासही समाजच जबाबदार आहे. कोट्यवधी रुपये खर्च केल्यावर डॉक्टरच्याही अपेक्षा वाढतात.