बहुचर्चित पिंटू शिर्के हत्याकांड : कुख्यात गुंड विजय मते गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 12:29 AM2017-10-23T00:29:46+5:302017-10-23T00:29:58+5:30
बहुचर्चित पिंटू शिर्के हत्याकांडात आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आलेला आरोपी विजय मते याला रविवारी रात्री ११ वाजता सक्करदरा पोलिसांनी ताब्यात घेतले. तो वर्षभरापासून फरार होता.
नागपूर : बहुचर्चित पिंटू शिर्के हत्याकांडात आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आलेला आरोपी विजय मते याला रविवारी रात्री ११ वाजता सक्करदरा पोलिसांनी ताब्यात घेतले. तो वर्षभरापासून फरार होता.
संपत्तीच्या वादातून वैमनस्य आल्यानंतर कुख्यात गँगस्टर राजू भद्रे, विजय मते आणि त्यांच्या साथीदारांनी भर कोर्टात पिंटू शिर्के याची हत्या केली होती. हे प्रकरण त्यावेळी देशभर गाजले होते. या प्रकरणात अटक केल्यानंतर राजू भद्रे नागपुरातील डॉन म्हणून कुख्यात झाला होता. प्रदीर्घ सुनावणीनंतर दोन वर्षांपूर्वी भद्रे, मते आणि साथीदारांना कोर्टाने आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर त्यांना कारागृहात डांबण्यात आले होते. वर्षभरापूर्वी संचित रजेवर बाहेर आल्यानंतर मते फरार झाला.
दिवाळीचे निमित्त साधून तो नागपुरात आल्याची माहिती कळाल्यानंतर मते याला सक्करदरा पोलिसांनी रविवारी रात्री ११ च्या सुमारास पकडले. वृत्त लिहिस्तोवर त्याला अटक करण्याची कागदोपत्री प्रक्रिया पोलीस ठाण्यात सुरू होती.