फॅन्सी नंबरची क्रेझ उतरली, शुल्क वाढीचा प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 06:00 AM2020-12-11T06:00:00+5:302020-12-11T06:00:03+5:30
Nagpur News RTO परिवहन विभागाने ७ वर्षांपूर्वी फॅन्सी नंबरच्या शुल्कात तीनपट वाढ केली. या वाढीने वाहनांवरील आकर्षक (फॅन्सी) नंबर घेण्याची ‘क्रेझ’ उतरली आहे.
सुमेध वाघमारे
नागपूर : परिवहन विभागाने ७ वर्षांपूर्वी फॅन्सी नंबरच्या शुल्कात तीनपट वाढ केली. या वाढीने वाहनांवरील आकर्षक (फॅन्सी) नंबर घेण्याची ‘क्रेझ’ उतरली आहे. धक्कादायक म्हणजे, शहर आटीओ कार्यालयांतर्गत चारचाकी वाहनांमध्ये चार लाखांच्या ‘१’ नंबरला अद्यापही ग्राहक मिळाला नाही. असे असताना, परिवहन विभाग या नंबरचे शुल्क वाढवून ६ लाखांचा करण्याचा विचारात आहे. त्या संदर्भातील हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत.
व्हीआयपी स्टेटस टिकविण्यासाठी फॅन्सी नंबरांसाठी अतिरिक्त पैसे मोजण्यास वाहनधारक पूर्वी नेहमीच तयार असायचे. अनेकदा फॅन्सी नंबरांसाठी एकापेक्षा जास्त अर्ज यायचे. अशावेळी आरटीओ कार्यालय मध्यस्थी किंवा बोली लावायचे. यातून मार्ग काढण्यासाठी परिवहन विभागाने २०१३ मध्ये फॅन्सी नंबरच्या शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार नागपूर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर, नाशिक या जिल्ह्यात ‘१’ नंबर हा चार लाख रुपयांचा तर इतर जिल्ह्यांमध्ये याच नंबरला तीन लाख रुपये शुल्क करण्यात आले. फॅन्सी नंबर महागल्यापासून चारचाकी वाहनधारकांनी या नंबरकडे पाठ दाखवली आहे. काही वाहनधारक महागड्या फॅन्सी नंबरच्या भानगडीत न पडता, सामान्य नंबरमधूनच चांगला नंबर मिळविण्यासाठी धडपडतानाचे चित्र आहे.
‘१’ नंबरला ग्राहक मिळण्याची शक्यता कमीच
पूर्वी ‘१’ नंबर १ लाख रुपयात मिळायचा. नंतर हा नंबर मोठ्या जिल्ह्यांसाठी ४ लाख तर इतर जिल्ह्यांसाठी ३ लाखांचा झाला. परंतु आता नव्या जिल्ह्यांसाठी व लहान जिल्ह्यांसाठी तब्बल २ लाखाने शुल्क वाढविण्याचा प्रस्ताव आहे. असे झाल्यास, ग्राहक मिळणे आणखी कठीण होण्याची शक्यता आहे.
दीड लाखांच्या नंबराप्रति उदासीनता
९, ९९, ७८६, ९९९ आणि ९९९९ या नंबरांची किंमत पूर्वी ५० हजार रुपये होती, नंतर त्यात वाढ करून दीड लाख रुपये करण्यात आली. सध्या या शुल्कामध्ये ७ फॅन्सीनंबर उपलब्ध असले तरी एकही नंबर गेलेला नाही. त्या खालोखाल ७० हजार व ५० हजार रुपयांमध्ये कमी आकर्षक नंबर असल्याने पाहिजे तो प्रतिसाद मिळन नसल्याचे चित्र होते. नव्या प्रस्तावात हा नंबर अडीच लाखांवर जाण्याची शक्यता आहे.
२०१९च्या तुलनेत यावर्षी २८३ प्रकरणे कमी
पूर्वी फॅन्सी नंबरचे शुल्क कमी असल्याने साधारण सर्वच फॅन्सी नंबरला ग्राहक मिळायचे. दोन कोटींवर महसूल प्राप्त व्हायचा. परंतु शुल्कात तीनपट वाढ झाल्याने त्या तुलनेत महसूल वाढला नाही. उलट कमी झाला आहे. एप्रिल ते नोव्हेंबर २०१९ मध्ये ८८४ वाहनधारकांनी फॅन्सी नंबर घेतले. यामधून शासनाला ७८१०५०० रुपयांचा महसूल मिळाला. मात्र या वर्षी एप्रिल ते नोव्हेंबर २०२०मध्ये २८३ प्रकरणांत घट झाल्याने ६०१ वाहनधारकांनी फॅन्सी नंबर घेतले. ५,५२,५००० महूसल मिळाला.