शानदार...जबरदस्त...जिंदाबाद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2019 11:24 AM2019-11-11T11:24:35+5:302019-11-11T11:25:04+5:30

रविवारी वायुदलाच्या शेरदील वैमानिकांनी हवामानाने दिलेल्या संधीचे अक्षरश: सोने केले. हवेत ‘एअरोबॅटिक’ कसरती दाखवत असताना विमानांनी अवकाशात चक्क ‘मिग-२१’च्या प्रतिकृतीचे ‘फॉर्मेशन’ तयार केले अन् हजारो नागपूरकरांच्या अंगावर रोमांच उभे झाले.

Fantastic ... awesome ... alive! | शानदार...जबरदस्त...जिंदाबाद!

शानदार...जबरदस्त...जिंदाबाद!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘सूर्यकिरण’...नावातच तेज, वेग आणि चपळता...शुक्रवारी संधी हुकल्याने नागपूरकरांना धाकधूक होती. परंतु रविवारी वायुदलाच्या शेरदील वैमानिकांनी हवामानाने दिलेल्या संधीचे अक्षरश: सोने केले. हवेत ‘एअरोबॅटिक’ कसरती दाखवत असताना विमानांनी अवकाशात चक्क ‘मिग-२१’च्या प्रतिकृतीचे ‘फॉर्मेशन’ तयार केले अन् हजारो नागपूरकरांच्या अंगावर रोमांच उभे झाले. केवळ ‘सूर्यकिरण’च नव्हे तर ‘सुखोई’च्या वेगाचा रोमांच, ‘गरुड’ पथकातील जवानांनी दाखविलेली युद्धकला, ‘आकाशगंगा’ चमूतील ‘पॅराट्रूपर्स’ने साकारलेला तिरंगा, ‘सारंग टीम’च्या वैमानिकांच्या ‘हेलिकॉप्टर्स’च्या माध्यमातील चित्तथरारक कवायती आणि ‘एनसीसी’च्या ‘कॅडेट्स’ने ‘एअरोमॉडेलिंग’मधून दाखविलेली हवेतील युद्धाचे प्रात्यक्षिक. प्रत्येक क्षण हा नागपूरकरांसाठी एक वेगळा अनुभव देणारा होता. सर्वच उपस्थितांच्या तोंडून भारतीय वायुदलासाठी शब्द निघाले, ‘शानदार...जबरदस्त...जिंदाबाद’!
मेंटेनन्स कमांड मुख्यालयाच्या ६५ व्या आणि भारतीय वायुसेनेच्या ८७ व्या स्थापनादिनानिमित्त ‘मेंटेनन्स कमांड’तर्फे १० नोव्हेंबर रोजी ‘एअर शो’चे आयोजन करण्यात आले. शुक्रवारी ‘एअर शो’ची ‘फुल ड्रेस रिहर्सल’ झाली होती. त्या दिवशी धुके असल्यामुळे ‘व्हिजिबिलिटी’ नव्हती. त्यामुळे कवायती सादर करता आल्या नव्हत्या. परंतु रविवारी अनुकूल हवामान होते व साडेदहाच्या सुमारास नऊ विमानांची चमू ‘एअरस्पेस’मध्ये पोहोचली. नारंगी व पांढऱ्या रंगाची ही ‘हॉल एचजेटी-१६’ विमाने एका रांगेत होती. त्यानंतर एकाहून एक थरारक कवायती या विमानांनी सादर केल्या. विशेष म्हणजे ‘मिराज’सह चंद्रयानाची केलेल्या हवेतील प्रतिकृतीने तर नागपूरकरांची मने जिंकली. कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे उपस्थित होते. शिवाय ‘मेन्टेनन्स कमांड’ मुख्यालयाचे ‘एअर आॅफिसर कमांडिग इन चीफ’ एअर मार्शल आर.के.एस.शेरा हेदेखील उपस्थित होते.
दरम्यान, एअर फोर्स बॅन्डनेदेखील विविध ‘थीम सॉन्ग’ सादर केले. तर दुसरीकडे रायफलधारी जवानांच्या ‘ड्रील’ने ‘एअर शो’मध्ये रंगत आणली. कदमताल करता करता क्षणात जवान एकमेकांच्या ‘रायफली’ ादलत होते.

‘पॅराट्रूपर्स’च्या धैर्याला सलाम
‘आकाशगंगा’ ही स्काय डायव्हिंग करणारी भारतीय वायुसेनेची चमू आहे. यामध्ये चौदा सदस्यांचा समावेश आहे. कुणाच्याही ध्यानीमनी नसताना सुमारे आठ हजार फूट उंचीवरून या चमूतील ‘पॅराट्रूपर्स’ने जमिनीकडे झेप घेतली. सर्वांच्या डोक्याच्या वर ‘पॅरेशूट्स’चे ठिपके दिसायला लागले व त्यानंतर एकानंतर एक सर्व ‘पॅराट्रूपर्स’ अलगदपणे जमिनीवर आले. तीनच्या जोडीने आलेल्या चमूने तर अवकाशात तिरंगा सादर केला व अवघ्या काही फुटांवर ते एकमेकांपासून वेगळे झाले. सर्वांनी या धाडसी कौशल्याची वाहवा केली.

फुटाळा, दाभा ‘हाऊसफुल्ल’
कार्यक्रमस्थळी निमंत्रितांनाच प्रवेश होता. परंतु या रोमांचित क्षणांचे साक्षीदार होता यावे यासाठी नागपूरकरांमध्ये प्रचंड उत्साह होता. त्यामुळे सकाळी ९ वाजल्यापासूनच लोक फुटाळा परिसर, दाभा तसेच अमरावती मार्गावर जमले होते. प्रत्यक्ष ‘एअर शो’ सुरू झाला तेव्हा तर तेथे पाय ठेवायलादेखील जागा नव्हती. रविवारची सुटी असल्याने लोक सहपरिवार तेथे आले होते. फुटाळा परिसरात तर वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती. विमानांचा थरार पाहण्यासाठी रस्त्यावरच गाडी उभी करून लोकांनी मोकळ््या जागेकडे धाव घेतली. शिवाय परिसरातील घरांच्या गच्च्यांवरदेखील लोकांची गर्दी होती. आपल्या मोबाईलमध्ये विमानांना टिपण्यासाठी लोकांचा प्रयत्न सुरू होता. यात आबालवृद्धांचा समावेश होता.

‘गरुड’च्या जवानांची युद्धकला
विशेष प्रशिक्षित जवानांचा समावेश असलेल्या ‘गरुड’च्या चमूने ’प्रत्यक्ष रणभूमीवर हवेतून जवान जमिनीवर कशा पद्धतीने उतरतात याचेदेखील चित्तथरारक सादरीकरण केले. ‘एमआय-१७’ हेलिकॉप्टर’मधून ही चमू दोरीच्या मदतीने उतरली व आपल्या ‘रायफल्स’सह शत्रूला टिपण्याच्या ‘पोझ’मध्ये बसली.

‘सारंग’ चमूच्या साहसिक कवायती
भारतीय हवाई दलाच्या हवाई कसरती करणाऱ्या सारंग हेलिकॉप्टर पथकाने तर ‘एअर शो’मध्ये आणखी थरार आणला. ‘सारंग’च्या दोन चमूमध्ये प्रत्येकी चार ‘ध्रुव’ हेलिकॉप्टर्सचा यात समावेश होता. विशिष्ट प्रकारे डिझाईन केलेल्या पंख्यांमुळे ध्रुव हेलिकॉप्टरमधून विविध प्रकारच्या कसरती करणे शक्य होते तसेच लष्करी वापरासाठी ते अत्यंत उपयुक्त ठरते. एकमेकांच्या समोर येत ‘क्रॉस’ करणे, अलगदपणे हेलिकॉप्टरची दिशा बदलत त्याला लंबरेषेत वर घेऊन जाणे, हवेत ‘हार्ट शेप फॉर्मेशन’ करणे इत्यादी कसरती या चमूने केल्या. सुमारे २० मिनिटे या कसरती सुरू होत्या. विशेष म्हणजे या चमूमध्ये ग्रुप कॅप्टन सचिन गद्रे व स्क्वॉर्डन लीडर स्नेहा कुळकर्णी या नागपूरकर वैमानिकांचा समावेश होता.

‘सुखोई’ पाहिल्याचे सुख
सर्वात अगोदर ‘एमआय-७५’ हेलिकॉप्टर अवकाशात दिसले व त्यानंतर काहीच वेळात ‘अ‍ॅव्ह्रो’ विमान ‘पास’ झाले. काहीच वेळात आलेल्या ‘सुखोई-सु-३०’ ला पाहून तर अनेकांच्या डोळ्याना विश्वास झाला नाही. सुखोईने प्रचंड वेगात असतानादेखील हवेतच कोलांटी घेतली व नागपूरकरांनी टाळ्या वाजवून त्याचे स्वागत केले. हवेत ‘सुखोई’ने दोनदा फेऱ्या मारल्या.

Web Title: Fantastic ... awesome ... alive!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.