प्रवासभाडे पेटले; अव्वाच्या सव्वा आकारणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2021 08:46 PM2021-11-09T20:46:59+5:302021-11-09T20:49:34+5:30
Nagpur News गावाखेड्यात पोहोचलेली एसटी बंद असल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांना ये-जा करणे अवघड झाले आहे. त्याचा फायदा खासगी वाहतूकदार भरपूर घेत आहेत.
नागपूर : ऐन सणासुदीच्या दिवसांत राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संपाचा सर्वांत मोठा फटका प्रवाशांना बसत आहे. गावाखेड्यात पोहोचलेली एसटी बंद असल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांना ये-जा करणे अवघड झाले आहे. त्याचा फायदा खासगी वाहतूकदार भरपूर घेत आहेत. अव्वाच्या सव्वा भाडे आकारून प्रवाशांची अक्षरश: लूट सुरू आहे. ज्या ज्येष्ठ नागरिकांना एसटीचे अर्धे तिकीट लागते, त्यांना वाहतूकदाराने मागितलेले पूर्ण भाडे द्यावे लागत आहे. खासगी वाहतूकदाराच्या भाडेवाढीवर प्रवासी संतप्त झाले असून, संबंधित विभागाने भाववाढीवर नियंत्रण ठेवावे, अशी प्रवाशांची मागणी आहे.
ग्रामीण प्रवाशांचे हाल
दरम्यान, एसटीच्या संपाचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील प्रवाशांना बसला. माेठ्या शहराच्या मार्गाने ट्रॅव्हल्स चालत असतात. ग्रामीण भागातील नागरिकांना एसटीशिवाय पर्याय राहत नाही, मात्र बस बंद असल्याने साधन नसलेल्यांना प्रवास टाळावा लागला. निकडीचे काम असलेल्या आत मधल्या गावातील लाेकांना खासगी साधन मिळविण्यासाठी माेठ्या गावापर्यंत पायी प्रवास करावा लागत आहे. येथे आल्यावरही साधनाची वाट पाहत ताटकळत बसावे लागल्याचे चित्र हाेते.
काळीपिवळी, ट्रॅक्स खचाखच
बस बंद असल्याचा पूर्ण फायदा काळीपिवळी, ट्रॅक्स अशा खासगी प्रवासी वाहनचालकांनी घेतला. ९ प्रवाशांची परवानगी असलेल्या ट्रॅक्समध्ये अशा दिवशी १५ प्रवासी बसविले जातात, पण सध्याची परिस्थिती लक्षात घेता १८ ते २० प्रवाशांना अक्षरश: काेंबण्यात येत आहे. उमरेड, आंभाेरा मार्गावर हे चित्र सर्रास दिसून येत आहे. राेजच्यापेक्षा २० ते ३० रुपये जादाचे आकारले गेल्याच्याही तक्रारी प्रवाशांनी केल्या. शिवाय, अर्ध्या तिकिटाने प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनाही अधिक पैसे माेजावे लागत आहेत. क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी भरणाऱ्या खासगी वाहनचालकांवर कुठलीही कारवाई पाेलिसांकडून करण्यात आली नाही.
शालेय विद्यार्थ्यांची होणार गोची
दिवाळीच्या सुट्या संपल्यानंतर गुरुवारपासून शाळा सुरू होणार आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्या-येण्याचे महत्त्वाचे साधन एसटी महामंडळाच्या बस असतात. पण कर्मचाऱ्यांच्या संपामुळे सर्वच डेपोतील बस डेपोतच थांबल्या आहेत. अशात महामंडळाने नागपूर डेपोतील १८ कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. त्यामुळे संप आणखी चिघळेल, असा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे. अशात दोन दिवसांत संप न मिटल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थी शाळेत पोहोचू शकणार नाहीत.