शेतमजुराच्या मुलाची अंतराळाला गवसणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2019 11:03 AM2019-08-10T11:03:36+5:302019-08-10T11:03:59+5:30

शेतमजुरी करणाऱ्या दाम्पत्याच्या मुलाने परिश्रम व जिद्दीच्या बळावर आयआयटी चेन्नईसारख्या देशातील प्रतिष्ठित संस्थेतून एअरोस्पेस इंजिनियरची पदवी घेत अंतराळाला गवसणी घातली आहे.

A farm boy's son gazes into space | शेतमजुराच्या मुलाची अंतराळाला गवसणी

शेतमजुराच्या मुलाची अंतराळाला गवसणी

Next
ठळक मुद्देएअरोस्पेस इंजिनियरच्या उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला जाणार

आनंद डेकाटे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : यवतमाळ म्हणजे शेतकरी आत्महत्यांसाठी संपूर्ण जगात कुप्रसिद्ध झालेला जिल्हा. असे असले तरी याच जिल्ह्यात शिक्षण आणि राजकारणातील गुणवंतांचीही खाण आहे. याच जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातील शेतमजुरी करणाऱ्या दाम्पत्याच्या मुलाने परिश्रम व जिद्दीच्या बळावर आयआयटी चेन्नईसारख्या देशातील प्रतिष्ठित संस्थेतून एअरोस्पेस इंजिनियरची पदवी घेत अंतराळाला गवसणी घातली आहे. तो इतक्यावरच थांबला नसून अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी परदेशी धर्तीवरील विद्यापीठापर्यंत मजल मारत अवकाशात आपल्या जिल्ह्याचे व देशाचे नाव कोरण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे.
सूरज डांगे असे या गुणवंत विद्यार्थ्याचे नाव. यवतमाळ जिल्ह्यातील बोरगाव (मादनी) हे त्याचे मूळ गाव. वडील देवानंद डांगे आणि आई पपिता डांगे हे दोघेही शेतमजुरी करतात. सूरज लहानपणापासूनच हुशार. चौथीपर्यंतचे शिक्षण त्याचे गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतच झाले, नंतर पाचवीसाठी तो जवळच्याच मादनी गावात शिकायला जाऊ लागला. नंतर तो बेलोरा येथील जवाहर नवोदय विद्यालय या केंद्रीय विद्यालयात शिकला. २०१२ मध्ये त्याने दहावी पूर्ण केली. दहावीला त्याने ९४ टक्के गुण घेतले. नंतर हैद्राबाद येथील नारायणा विद्यालयातून १२ वी केली. १२ वीला ९६ टक्के घेतले. १२ वी करीत असतानाच सूरज आयआयटीचीही तयारी करीत होता. आयआयटीची प्रवेश परीक्षा तो उत्तीर्ण झाला. आयआयटी-चेन्नई येथून त्याने एअरोस्पेस इंजियनियरिंग (बी.टेक.) केले. एअरोस्पेसच्या क्षेत्रात बी.टेक. केल्याने त्याला नोकरीच्या चांगल्या संधी चालून येऊ लागल्या. परंतु तो इथेच थांबला नाही. त्याचे लक्ष्य आणखी मोठे होते. इस्रो, नासा यासारख्या अंतराळाच्या क्षेत्रातील जगप्रसिद्ध संस्थांमध्ये काम करण्याचे त्याचे स्वप्न आहे. त्यामुळे या क्षेत्रात उच्च शिक्षण घ्यायचे त्याने ठरवले. एअरोस्पेस इंजिनियरिंगमध्ये एम.एस. करण्याचा निर्णय घेतला, तसे प्रयत्न सुरु ठेवले. अखेर प्रयत्न फळाला आले. अमेरिकेतील परड्यू या जगप्रसिद्ध विद्यापीठात त्याला एम.एस. ला प्रवेश मिळाला. ९ आॅगस्ट या क्रांतिदिनी अंतराळाला गवसणी घालण्यासाठी तो अमेरिकेला रवाना झाला आहे.

हर्षदीप कांबळे सूरजच्या आयुष्याचे शिल्पकार
राज्यातील एक वरिष्ठ सनदी अधिकारी असलेले डॉ. हर्र्षदीप कांबळे हे सामाजिक कार्यासाठी ओळखले जातात. सूरजच्या आयुष्याचे खरे शिल्पकारही तेच ठरले. २००७ सालची ती गोष्ट डॉ. कांबळे हे यवतमाळचे जिल्हाधिकारी होते. त्यांनी समता पर्वच्या माध्यमातून वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते. सूरज सहाव्या सातव्या वर्गात शिकत होता. त्याचे इंग्रजीचे शिक्षक अशोक राऊत यांनी सूरजला स्पर्धेत भाग घेण्यास सांगितले. सूरजने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधान यावर सुरेख भाषण दिले. संपूर्ण जिल्ह्यातून तो पहिला आला. जिल्हाधिकाऱ्यांच्या बंगल्यावर त्याला रीतसर स्नेहभोजनाचा आमंत्रण मिळाले. सूरजचे आई-वडिलही त्या कार्यक्रमात होते. त्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी सूरजने डॉ. कांबळे यांच्याशी चर्चा करताना मला खूप शिकायचे आहे, असे सांगितले. डॉ. कांबळे त्याच्या एकूणच वक्तृत्वाने प्रभावित झाले आणि तुला जितके शिकायचे आहे शिक. काहीही अडचण आली तर मला सांग, मी पूर्ण करीन, असे साांगत त्याच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली. डॉ. हर्षदीप कांबळे यांनी ती जबाबदारी पूर्णपणे निभावली. सूरज आयआयटी आणि आता अमेरिकेला जाऊन उच्च शिक्षण घेऊ शकत आहे. केवळ सूरजच नव्हे तर त्याची लहान बहीण प्रियंकासुद्धा आज बी.टेक. करीत आहे. ते केवळ त्यांच्यामुळेच. याची जाणीव सूरजलाही आहे. डॉ. कांबळे सरांनी त्याला एक गुरुमंत्र दिला आहे तो म्हणजे तुला रोल मॉडेल व्हायचे आहे. कठीण परिस्थितीतून तू कसे यश मिळविले हे इतरांसाठी प्रेरणादायी ठरावे. त्यांचा हा विश्वास सूरजने आज खºया अर्थाने सार्थ केला आहे.

डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे पुस्तक ठरले प्रेरणा
सूरजला एअरोस्पेस इंजिनियर व्हायची खरी प्रेरणा डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे विंग्स आॅफ फायर हे पुस्तक वाचून मिळाली. यापूर्वी दहावीत असताना एकदा त्याच्या शाळेतर्फे तो नागपूरच्या रिमोट सेन्सिंग सेंटरला आला होता. तेव्हा तो पहिल्यांदा अंतराळाबाबत प्रभावित झाला. त्यानंतर डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे पुस्तक वाचून त्याला खरी प्रेरणा मिळाली आणि त्याने एअरोस्पेस इंजिनियर व्हायचे ठरवले आणि ते पूर्णही केले.

Web Title: A farm boy's son gazes into space

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.