शेती, घर, पैसा आण, मगच नांदायला ये!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 04:26 AM2020-12-14T04:26:21+5:302020-12-14T04:26:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क उमरेड : ‘तू मला आवडत नाही. तू काळी आहेस. आईवडिलांच्या सांगण्यावरून तुझ्याशी लग्न केले. जर तुला ...
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरेड : ‘तू मला आवडत नाही. तू काळी आहेस. आईवडिलांच्या सांगण्यावरून तुझ्याशी लग्न केले. जर तुला माझ्यासोबत नांदायचे असेल तर तुझ्या वडिलांची चार एकर शेती, राहते घर माझ्या नावाने करून द्यायला सांग आणि आपल्या पित्याकडून ५० हजार रुपये आण’ असा तगादा लावून अश्लील शब्दात शिवीगाळ करीत मारहाण करणाऱ्या पतीविरोधात पत्नीने तक्रार दिली आहे.
उमरेड येथील हा प्रकार असून, जावयाच्या या अफलातून डिमांडमुळे नवविवाहिता चांगलीच घाबरली आहे. स्थानिक मंगळवारी पेठ येथील उषा हिचे उमरेड परसोडी (पाण्याच्या टाकीजवळ) सतीश उपासराव तुळसकर याच्याशी २४ मे २०२० रोजी विवाह झाला. कोरोनाच्या उद्रेकाच्या परिस्थितीत आणि लॉकडाऊनच्या काळात हा सोहळा थाटामाटात झाला. उषाने सुखी संसाराची स्वप्ने रंगविली होती. अशातच पती सतीश तुळसकर, सासरे उपासराव तुळसकर आणि सासू प्रमिला तुळसकर यांनी काही दिवसातच त्रास देणे सुरू केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
माझे आईवडील गरीब आहे, ते कुठून पैसे देतील, अशी वारंवार विनंती केल्यानंतरसुद्धा बेदम मारहाण होत असे. शिवाय माझे कुणीही काहीही बिघडवू शकत नाही. माझी पोहोच वरपर्यंत आहे. माझ्या विरोधात तक्रारसुद्धा घेतली जाणार नाही, अशी धमकीही पती सतीशने दिल्याची बाब तक्रारीत नमूद आहे. सदर प्रकरणाची तक्रार उमरेड पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पोलिसांनी योग्य चौकशी करीत दोषींवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली जात आहे.
....
याप्रकरणाची तक्रार आमच्याकडे आली आहे. सदर प्रकरण आधी महिला समुपदेशन केंद्राकडे पाठविल्यानंतर दोघांचेही मधुर संबंधासाठी हे केंद्र प्रयत्न करेल. गुंता सुटला नाही तर मग कोणत्या पक्षाची चूक आहे, या निष्कर्षानंतर संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे पत्र केंद्र पोलीस ठाण्याला देईल.
- यशवंत सोलसे, पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन, उमरेड.