कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2024 05:09 PM2024-05-03T17:09:44+5:302024-05-03T17:11:06+5:30
Nagpur : सायसर येथील घटना; विहिरीत उडी घेऊन संपविले जीवन
लोकमत न्यूज नेटवर्क
पिपरा (बेला): थकीत कर्जाचे हप्ते भरणे कठीण जात असल्याने कंटाळलेल्या शेतकऱ्याने शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना बेला पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पिपरालगतच्या सायसर शिवारात बुधवारी (दि. १) दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली.
प्रशांत बाबाराव आगलावे (३८, रा. सायसर, ता. उमरेड) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. प्रशांतकडे चार एकर सामाईक शेती आहे. पिपरा व बेला येथील बँकेतून तसेच बजाज फायनान्सकडून कर्ज घेतले होते. शिवाय, मित्र व नातेवाइकाकडूनही उसने पैसे घेतले होते. त्याला या कर्जाच्या हप्त्यापोटी दर महिन्याला १८ हजार रुपये बँकांना द्यावे लागायचे. आर्थिक परिस्थिती पडल्याने बँकांचे हप्ते भरणे शक्य होत नसल्याने तो मागील काही दिवसांपासून चिंतित होता. त्यातच त्याने बुधवारी सायसर शिवारातील मिलिंद दामोदर आयचित, रा. नागपूर यांच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. कैलास वंजारी शेतात गेले असता ही बाब त्यांच्या निदर्शनात आली. त्यामुळे त्यांनी लगेच पोलिस पाटील राजू कावळे यांच्या माध्यमातून पोलिसांना कळविली. ठाणेदार अजित कदम यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळ गाठून पंचनामा केला आणि मृतदेह विहिरीतून बाहेर काढत उमरेड शहरातील ग्रामीण रुग्णालयात पाठविला. याप्रकरणी बेला पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. मृताच्या कुटुंबीयांना राज्य सरकारने आर्थिक मदत करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
दुचाकीसह साहित्य विहिरीच्या काठावर
प्रशांतने आत्महत्या करण्यापूर्वी त्याची मोटरसायकल, शर्ट, मोबाइल फोन व चपला विहिरीच्या काठावर ठेवल्या होत्या. शर्टच्या खिशात २०० रुपये आणि चिठ्ठी आढळून आली. चिठ्ठीत कर्जाच्या हप्त्याचा उल्लेख असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याच्या पश्चात पत्नी व तीन मुले आहेत.