वीज काेसळून शेतमजुराचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:19 AM2021-09-02T04:19:16+5:302021-09-02T04:19:16+5:30
बेला : शेतातील कपाशी पिकात डवरणीचे काम करीत असताना पावसाला सुरूवात झाली. अशातच जाेरात कडाडलेली वीज थेट अंगावर पडल्याने ...
बेला : शेतातील कपाशी पिकात डवरणीचे काम करीत असताना पावसाला सुरूवात झाली. अशातच जाेरात कडाडलेली वीज थेट अंगावर पडल्याने शेतमजुराचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना बेला शिवारात बुधवारी (दि.१) दुपारी १.१५ वाजता घडली.
लक्ष्मण चंपतराव डांगरे (४५, रा. बेला, ता. उमरेड) असे मृताचे नाव आहे. लक्ष्मण हा बेला शिवारातील पूर्ती साखर कारखान्याच्या मागील बाजूस असलेल्या किसनाजी तिमांडे यांच्या शेतात कपाशी पिकात डवरणीच्या कामाला गेला हाेता. दुपारच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरूवात झाली. त्यामुळे लक्ष्मणने शेतातील एका पळसाच्या झाडाचा आडाेसा घेतला. अशातच जाेरात कडाडलेली वीज थेट अंगावर पडल्याने लक्ष्मणचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच बेला पाेलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उमरेड ग्रामीण रुग्णालयात पाठविला.
लक्ष्मण डांगरे यांच्या अकाली मृत्यूमुळे बेला गावात शाेककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा आप्तपरिवार आहे.