रात्रीचे ओलीत करायला गेला अन् जीवच गेला! शेतमजुराचा अंधारात विहिरीत पडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2021 06:12 PM2021-12-28T18:12:35+5:302021-12-28T18:13:02+5:30
Nagpur News रात्रीच्या वेळी पिकाला पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतमजुराचा शेतातील विहिरीत पडून करुण अंत झाला.
नागपूर: महावितरणकडून कृषी पंपांना रात्रीचा वीज पुरवठा केला जातो. अशात रात्रीच्या वेळी पिकाला पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतमजुराचा शेतातील विहिरीत पडून करुण अंत झाला. शिवलाल जंगी उईके (३५, रा. रमना) असे मृताचे नाव आहे. नरखेड तालुक्यातील मोहदी (धोत्रा) शिवारात मंगळवारी सकाळी ७.३० वाजता ही घटना उघडकीस आली.
ईर्शाद पठाण. (रा. नरखेड) यांनी मोहदी (धोत्रा) शिवारात ४.३० एकर शेती ठेक्याने वहिवाटीसाठी घेतली आहे. शिवलाल हा त्यांच्या शेतात काम करत होता. रविवारी रात्री ९ वाजता विद्युत पुरवठा सुरू होणार असल्यामुळे तो शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी गेला होता. मात्र दोन दिवस होऊनही तो घरी परत आला नव्हता. त्यामुळे त्याच्या पत्नीने व भावाने त्याचा शोध घेतला. मात्र कुठेही शोध लागला नाही. मंगळवारी ईर्शाद पठाण सकाळी ७.३० वाजता शेतात गेले असता, शिवलाल याचा मृतदेह त्यांना शेतातील विहिरीत तरंगताना आढळून आला. त्यांनी या घटनेची माहिती नरखेड पोलिसांना दिली. माहिती मिळताच नरखेड पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह विहिरीबाहेर काढून घटनास्थळाचा पंचनामा केला.
अंधारामुळे गेला तोल
शिवलाल याला रात्री मोटार पंप सुरू करतेवेळी अंधार असल्यामुळे विहिरीचा अंदाज घेता आला नसावा. त्यामुळे त्याचा विहिरीत पडून मृत्यू झाला आसावा, असा प्राथमिक अंदाज नरखेड पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. तपास पोलीस नायक दिनेश वरठी व दिगंबर राठोड करीत आहेत.
आणखी किती दिवस रात्रीचे सिंचन?
शेतकऱ्यांना शेतातील पिकांना पाणी देण्याकरिता नियमित विद्युत पुरवठा मिळत नाही. याकरिता आपला जीव धोक्यात टाकावा लागत आहे. महावितरणच्या वेळापत्रकानुसार तालुक्यात बुधवार ते शुक्रवारी सकाळी ७.३० ते दुपारी ३ वाजेपर्यंत, रविवार व सोमवार रात्री ९ ते पहाटे ५ पर्यंत, शनिवारी सकाळी ७ ते दुपारी ३ पर्यंत व रात्री ९ ते पहाटे ५ वाजेपर्यंत विद्युत पुरवठा केला जात आहे. मंगळवारी पूर्ण दिवस पुरवठा बंद असतो. त्यामुळे शेतकऱ्यांना गहू, चणा, संत्रा, मोसंबी, भाजीपाल्यास पाणी देण्याकरिता जिवावर उदार होऊन रात्री कडाक्याच्या थंडीत शेतात जावे लागते.