रस्त्याच्या वादातून शेतकरी कुटुंबास मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:07 AM2021-07-05T04:07:13+5:302021-07-05T04:07:13+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क भिवापूर : शेतात जाण्यासाठी असलेला रस्ता बंद केल्यामुळे पर्यायी व्यवस्था करणाऱ्या शेतकऱ्याशी वाद घालत, त्याला व ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
भिवापूर : शेतात जाण्यासाठी असलेला रस्ता बंद केल्यामुळे पर्यायी व्यवस्था करणाऱ्या शेतकऱ्याशी वाद घालत, त्याला व त्याच्या कुटुंबीयांना चाैघांनी जबर मारहाण केली. ही घटना तालुक्यातील नवेगाव (देशमुख) येथे रविवारी (दि.४) सकाळच्या सुमारास घडली. याप्रकरणी एकाच कुटुंबातील चाैघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
स्वप्निल मधुकर शंभरकर, सुभाष मधुकर शंभरकर, मधुकर विठोबा शंभरकर, शशिकला मधुकर शंभरकर सर्व रा. नवेगाव (देशमुख) अशी गुन्हा नाेंदविण्यात आलेल्या आराेपींची नावे आहेत. गजानन गंगाधर महाल्ले (३७, रा. नवेगाव (देशमुख) असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे. फिर्यादी गजानन महाल्ले यांची गावालगत शेती असून, शेतात जाण्याकरिता शिवधुरा आहे. मात्र आरोपींनी काही वर्षांपूर्वी या शिवधुऱ्यावरून महाल्ले यांची वहिवाट बंद केली. त्यामुळे ते थुटानबोरी पुनर्वसनातील मार्गाने शेतात जात होते. मात्र याच मार्गावर बंधारा असून, पावसाळ्यात तेथे पाणी साचले आहे. फिर्यादी शेतकऱ्याने पर्यायी व्यवस्था करत, पाणी साचलेल्या भागात पायल्या टाकून रस्ता तयार करण्याचे काम सुरू केले. दरम्यान, आरोपींनी वाद घातल्याने फिर्यादीची आई शांता महाल्ले यांनी आठ दिवसापूर्वी तहसील कार्यालयाकडे लेखी तक्रार करीत दाद मागितली आहे. अशातच रविवारी सकाळच्या सुमारास फिर्यादीचा भाऊ मंगेश घटनास्थळी काम करीत असताना आरोपींनी त्याच्याशी वाद घालायला सुरुवात केली. त्यानंतर तेथे आलेल्या फिर्यादी व त्याच्या आईशीसुद्धा वाद घालत त्यांना काठी व लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. लागलीच फिर्यादीने पोलीस स्टेशन गाठत तक्रार दाखल केली. याप्रकरणी भिवापूर पाेलिसांनी चार आराेपींविरुद्ध भादंवि कलम ३२३, ३२४, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा नाेंदविला आहे. ठाणेदार महेश भोरटेकर यांच्या मार्गदर्शनात राजेंद्र डहाके पुढील तपास करीत आहेत.
सदर चारही आराेपी आक्रमक प्रवृत्तीचे आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून वारंवार कुणाशीही वाद घालणे व मारहाण करण्याचे प्रकार सर्रास होतात. वर्षभरापूर्वीसुद्धा काेंबडी घरात शिरली, या क्षुल्लक कारणावरून चौघांनीही अन्य एकास मारहाण केली होती. याप्रकरणी आराेपींविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल आहे.
040721\1747-img-20210704-wa0099.jpg
याच ठिकाणी पायल्या टाकून पर्यायी व्यवस्था करणा-याला मारहान करण्यात आली.