शेतकऱ्याच्या अवयवदानाने चार रुग्णांना जीवनदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 10:55 PM2018-06-20T22:55:53+5:302018-06-20T22:56:11+5:30
अवयवदानाचे अनन्यसाधारण महत्त्व आता समाजात रुजायला लागले आहे. विशेषत: नातेवाईक असह्य दु:खात असताना स्वत:ला सावरत आपल्या माणसाचे अस्तित्व कायम ठेवण्याचा निर्णय घेत आहेत. त्यांच्या या संयम आणि मानवतावादी भूमिकेमुळे बुधवारी पुन्हा एका मेंदू मृत (ब्रेन डेड) व्यक्तीकडून हृदय, यकृत, दोन्ही मूत्रपिंड दान करून चार रुग्णांना जीवनदान देण्यात आले तर दोघांना दृष्टी मिळाली. विशेष म्हणजे, मेंदू मृत व्यक्ती ही शेतकरी असल्याने या दानाला आणखी महत्त्व प्राप्त झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अवयवदानाचे अनन्यसाधारण महत्त्व आता समाजात रुजायला लागले आहे. विशेषत: नातेवाईक असह्य दु:खात असताना स्वत:ला सावरत आपल्या माणसाचे अस्तित्व कायम ठेवण्याचा निर्णय घेत आहेत. त्यांच्या या संयम आणि मानवतावादी भूमिकेमुळे बुधवारी पुन्हा एका मेंदू मृत (ब्रेन डेड) व्यक्तीकडून हृदय, यकृत, दोन्ही मूत्रपिंड दान करून चार रुग्णांना जीवनदान देण्यात आले तर दोघांना दृष्टी मिळाली. विशेष म्हणजे, मेंदू मृत व्यक्ती ही शेतकरी असल्याने या दानाला आणखी महत्त्व प्राप्त झाले आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील वणी या गावातील रहिवासी सुरेश डुकरे (३५) असे अवयव दात्याचे नाव.
प्राप्त माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी वणी येथे झालेल्या रस्ता अपघातात सुरेश डुकरे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तेथील डॉक्टरांनी तपासून तातडीने नागपुरात हलविण्याचा सल्ला दिला. नातेवाईकांनी रविवारी नागपुरातील लकडगंज येथील न्यू इरा हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल केले. येथील न्यूरो सर्जन डॉ. नीलेश अग्रवाल व त्यांच्या चमूने शर्थीचे प्रयत्न केले. परंतु उपचारात सुरेशची साथ मिळत नव्हती. यातच मंगळवारी डॉक्टरांनी सुरेश यांचा ‘ब्रेन डेड’ झाल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांना दिली. सुरेश यांना एक पाच व तीन वर्षाची मुलगी आणि पत्नी प्रिया आहे. कर्त्या व्यक्तीच्या अचानक मृत्यूमुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. त्या स्थितीतही डॉ. अग्रवाल यांनी डुकरे कुटुंबीयांना अवयवदानाची कल्पना दिली. स्वत:ला सावरत या कुटुंबीयांनी आपल्या माणसाचे अस्तित्व कायम राखण्याचा निर्णय घेतला. याची माहिती झोनल ट्रान्सप्लान्ट कोआॅर्डिनेशन सेंटरच्या (झेडटीसीसी) अध्यक्ष डॉ. विभावरी दाणी, सचिव डॉ. रवी वानखेडे यांना देण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनात डॉ. सुधीर टॉमी व नागपूर झोन कॉर्डिनेटर वीणा वाठोरे यांनी तातडीने पुढील प्रक्रिया पूर्ण केली. बुधवारी अवयव काढण्याच्या शस्त्रक्रियेला सुरुवात झाली. हृदय, यकृत, दोन्ही मूत्रपिंड व नेत्रदान करण्यात आले.
यवतमाळचे हृदय गेले चेन्नईला
सुरेश डुकरे यांचे हृदय घेऊन जाण्यासाठी विशेष विमानाने चेन्नई येथील डॉक्टरांची चमू नागपुरात पोहचली. दुपारी ३.३० वाजता लकडगंज न्यू इरा हॉस्पिटल ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर विमानतळ हा मार्ग ग्रीन कॉरिडोर करण्यात आला. केवळ १० मिनिटांच्या अवधीत रुग्णवाहिका विमानतळावर पोहचली. तेथून विशेष विमानाने हृदय चेन्नईला पोहचले. पुढील तीन तासांत हृदयाचे यशस्वी प्रत्यारोपणही करण्यात आले. या शस्त्रक्रियेत डॉ. मनोज दुरारीराज, डॉ. प्रशांत धुमाळ, डॉ. शंतनु शास्त्री व मुकेश आदिले आदींचा सहभाग होता. यवतमाळचे हृदय नागपूरहून चेन्नईला गेले.
३५ वर्षीय तरुणाला दिले यकृत
कळमेश्वर येथील एका ३५ वर्षीय तरुणाचे यकृत निकामी झाल्याने तो न्यू इरा हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होता. सुरेश डुकरे यांच्या अवयवदानामुळे त्याला यकृत उपलब्ध झाले. रात्री उशिरापर्यंत त्यांच्यावर यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया सुरू होती. ही शस्त्रक्रिया यकृत प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. राहुल सक्सेना, डॉ. राहुल राय, डॉ. साहिल बन्सल, डॉ. सविता जयस्वाल आणि डॉ. सोमंत चट्टोपध्याय यांनी केली.
वोक्हार्ट व आॅरेंज सिटी हॉस्पिटलच्या रुग्णाला मूत्रपिंडाचे दान
वोक्हार्ट हॉस्पिटल व आॅरेंज सिटी हॉस्पिटलच्या प्रत्येकी एक-एक रुग्णाला मूत्रपिंडाचे दान करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया सुरू होती. यात मूत्रपिंड प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. संजय कोलते, डॉ. श्रीनारायण आचार्य, डॉ. योगेश देशमुख आदींचा सहभाग होता. तर सुरेश डुकरे यांची दोन्ही बुबुळ महात्मे नेत्रपेढीला दान करण्यात आली.