शेतकरी कर्जमाफी! 'वचन मोडलं तर आम्ही कसे वागतो हे जनतेला माहितीय'
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2019 01:58 PM2019-12-17T13:58:26+5:302019-12-17T14:02:30+5:30
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सभागृहात झालेल्या गोंधळावरुन भाजपाला लक्ष्य केलं.
नागपूर - शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी शिवसेना पक्षप्रमुख म्हणून मी स्वत: अनेकवेळा रस्त्यावर उतरलो आहे. वचन मोडलं तर आम्ही कसे वागतो, हे लोकांना कळलंय. जनतेला याची खात्री पटलीय, त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांना दिलेली आश्वासन पाळणार हेही त्यांना कळलंय, असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला. तसेच, भाजपा नेत्यांनी आम्हाला वचन पाळण्याचं शिकवू नये, असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सभागृहात झालेल्या गोंधळावरुन भाजपाला लक्ष्य केलं. विरोधकांनी सभागृहात समस्या मांडायच्या असतात, पण हा गोंधळ बरा नव्हे. केंद्राकडून राज्याला येणारा 15 हजार कोटींची परतावा मिळण्यास सुरुवात झाली आहे. साधारण 4 ते 4.5 हजार कोटी रुपयांचा पहिला हफ्ता राज्याला मिळाल्याची नुकतीच माहिती मला मिळालीय. तसेच, भाजपा नेते आणि विरोधक जी घोषणाबाजी सभागृहात करतायेत, ती केंद्रातल्या सरकारकडे करायला पाहिजे होती. जे लोकं सामना वाचत नाही म्हणत होती, तीच लोकं आज सामना वर्तमानपत्राचे पोस्टर्स घेऊन सभागृहात आली होती. त्यामुळे सामना वाचत नाही, हे केवळ ते दाखवत होते, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीसांना त्यांच्या वाक्याची आठवण करुन दिली. फडणवीसांनी आधीच सामना वाचला असता तर आज आमचा आणि त्यांचा सामना झाला नसता. फडणवीस सामना वाचत नाही, असे सांगत होते. मात्र, आज त्यांच्या हातात सामना दिसला. त्यामुळे आम्ही सामनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जनतेचे विषय मांडत होतो, हे त्यांनी कबूल केले, असेही ठाकरेंनी म्हटले. सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी बांधिल असून जयंत पाटील यांनी मदतीची आकडेवारी दिलीय. त्यानुसार, शेतकऱ्यांना मदत पुरविण्यत येत असल्याचेही उद्धव ठाकरेंनी सांगितले.
दरम्यान, नागरिकत्व सुधारणा विधेयकावरुन सुरू असलेल्या वादावरही उद्धव ठाकरेंनी भाष्य केलं. जालियनावाला बाग हत्याकांडाची आठवण झाल्याचं सांगत, मोदी सरकारवर टीकाही केली. तसेच, केवळ उत्तर नसल्याने प्रश्न निर्माण केल्या जात आहेत. जनतेला चिंतेत ठेवायचं, अस्वास्थ्य ठेवायचं, छोटाशा कारणावरुन ठिणग्या टाकण्याचे काम केलं जात आहे, असेही त्यांनी म्हटले. तसेच, हिंदुत्ववाच्या मुद्द्यावर कसं उत्तर द्ययाचं हे मला चांगला ठाऊक आहे, ते मला शिकवण्याची गरज नाही, असे म्हणत सावरकरांच्या आणि हिदुत्त्वाच्या मुद्द्यावरुन शिवसेना व मुख्यमंत्र्यांना टार्गेट करणाऱ्या भाजपा नेत्यांना उद्धव ठाकरेंनी टोला लगावला.