शेतकरी महिलांची रामगिरीवर धडक

By admin | Published: February 29, 2016 02:46 AM2016-02-29T02:46:50+5:302016-02-29T02:46:50+5:30

ग्रामीण भागातील महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी वर्धा जिल्ह्यातील शेतकरी महिलांनी मुख्यमंत्र्यांच्या रामगिरी निवासस्थानी धडक दिली.

Farmer women hit on Ramgiri | शेतकरी महिलांची रामगिरीवर धडक

शेतकरी महिलांची रामगिरीवर धडक

Next

स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा : क्रांतिकारी शेतकरी महिला संघटना
नागपूर : ग्रामीण भागातील महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी वर्धा जिल्ह्यातील शेतकरी महिलांनी मुख्यमंत्र्यांच्या रामगिरी निवासस्थानी धडक दिली. मशाली घेऊन आलेल्या या महिलांना पोलिसांनी अडवून ताब्यात घेतले. यावेळी महिलांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
दुष्काळ, नापिकी, शेतमालाला बाजारपेठेत भाव नाही, त्यामुळे विदर्भातील शेतकरी आत्महत्या करीत आहे. आत्महत्येमुळे शेतकऱ्याचा प्रश्न सुटत असला तरी, घरच्या महिलेवर कुटुंबाच्या पालनपोषणाचे संकट उभे ठाकले आहे. नवऱ्याच्या आत्महत्येनंतर सर्व जबाबदाऱ्या सांभाळाव्या लागतात. त्यासाठी या महिला शेतात राबत आहेत. मुले अनाथ झाली आहे. शेतकरी महिलांचे प्रश्न सरकारपुढे मांडावे, यासाठी क्रांतिकारी शेतकरी महिला संघटनेतर्फे रविवारी मुख्यमंत्र्यांच्या रामगिरी निवासस्थानी मंदा ठवरे यांच्या नेतृत्वात वर्धा जिल्ह्यातील महिला शेतकऱ्यांनी धडक दिली. हाती मशाली घेऊन या महिलांनी रामगिरीपुढे धरणे दिले. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, सिंचन योजना लागू करावी, शेतकऱ्यांच्या मालाला बोली लावण्याचा अधिकार शेतकऱ्यांना मिळावा, शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर हमी भाव देण्यात यावा, वयोवृद्ध शेतकऱ्यांसाठी पेन्शन योजना सुरू करावी, शेतकऱ्यांच्या विधवांचे पुनर्वसन करावे, विधवांना शासनातर्फे संपूर्ण रक्कम देण्यात यावी, विदर्भातील औद्योगिक क्षेत्रात स्थानिक बेरोजगार तरुण, तरुणींना प्राधान्य देण्यात यावे, अशा मागण्या या महिलांच्या होत्या.
मोर्चात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवा, शेतमजूर महिलांचा समावेश होता. मुख्यमंत्र्यांना भेटण्याची मागणी महिलांनी पोलिसांना केली. सरकारविरोधात घोषणाबाजीही करण्यात आली. शेवटी पोलिसांनी या महिलांना ताब्यात घेतले. (प्रतिनिधी)

Web Title: Farmer women hit on Ramgiri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.