वाघाच्या हल्ल्यात शेतकरी महिला ठार
By admin | Published: July 8, 2017 02:22 AM2017-07-08T02:22:41+5:302017-07-08T02:22:41+5:30
शेतात निंदण करीत असलेल्या महिलेवर पट्टेदार वाघाने झडप मारत हल्ला चढविला. वाघाने तिला पकडून तब्बल दीड कि.मी.पर्यंत जंगलात फरफटत नेले.
वेळगाव शिवारातील घटना : दीड कि.मी.पर्यंत नेले फरफटत
लोकमत न्यूज नेटवर्क
मांढळ : शेतात निंदण करीत असलेल्या महिलेवर पट्टेदार वाघाने झडप मारत हल्ला चढविला. वाघाने तिला पकडून तब्बल दीड कि.मी.पर्यंत जंगलात फरफटत नेले. ही घटना उमरेड कऱ्हांडला अभयारण्यांतर्गत येणाऱ्या कुही तालुक्यातील वेळगाव शिवारात शुक्रवारी दुपारी १२.१५ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे वेळगाव परिसरात दहशत निर्माण झाली असून, नुकसानभरपाईच्या मागणीसाठी गावात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
पार्वती राजेराम परतेकी (५५, रा. वेळगाव, ता. कुही) असे मृत महिलेचे नाव आहे. पार्वती परतेकी यांची वेळगाव शिवारात शेती असून, हा भाग उमरेड कऱ्हांडला अभयारण्यांतर्गत येतो. ती शुक्रवारी सकाळी मुलगा आणि सुनेसोबत शेतात धानाच्या पऱ्ह्याचे निंदण करण्यासाठी गेली होती. दुपारच्या सुमारास मुलगा आणि सून पाणी पिण्यासाठी थोडे दूर गेले असता, झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने झडप मारून तिला पकडले. हा प्रकार लक्षात येताच दोघांनीही तिला वाघाच्या तावडीतून सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाघ चवताळला असल्याने त्यांना काही करणे शक्य झाले नाही. त्यातच परिसरातील शेतकरी व गुराखी गोळा झाले. त्यांनीही प्रयत्न केले परंतु यश आले नाही.
त्यातच वाघाने पार्वतीला दीड कि.मी.पर्यंत फरफटत जंगलात नेले. दुसरीकडे, घटनेची माहिती मिळताच अंदाजे २०० ग्रामस्थ जंगलात गेले. मोठ्या प्रयत्नानंतर वाघाने तिला सोडून पळ काढला. माहिती मिळताच एसीएफ बोबडे, उपविभागीय अधिकारी (महसूल) लोंढे, तहसीलदार लांजेवार यांच्यासह वन व महसूल विभागाचे अधिकारी तसेच पोलीस घटनास्थळी पोहोचले. वन विभागाने नुकसानभरपाई देण्याचे मान्य केल्याने सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला.
नुकसानभरपाईच्या मागणीवरून तणाव
वन विभागाने २५ लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी तसेच मुलाला शासकीय नोकरी द्यावी अशी मागणी रेटून धरली. ही मागणी पूर्ण केल्याशिवाय मृतदेह उचलू देणार नाही, अशी आग्रही भूमिका ग्रामस्थांनी घेतल्याने त्यामुळे गावात तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, वन विभागाने मृताच्या कुटुंबीयांना ५० हजार रुपयांची तत्काळ आर्थिक मदत केली. तसेच उर्वरित ७.५० लाख रुपये सोमवारी (दि. १०) देण्याचे लेखी आश्वासन दिल्याने तणाव निवळला. या शिवारातील जंगलाला तारेचे कुंपण लावण्याची मागणीही व विभागाने मान्य केली.