२५ गावातील शेतकरी सिंचनापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2019 01:30 AM2019-07-30T01:30:27+5:302019-07-30T01:31:49+5:30
पोहरा नदीवर बांधलेला बंधारा विहीरगाव येथे अडविण्यात आला आहे. त्यामुळे २० ते २५ गावांमधील शेतकऱ्यांच्या सिंचनाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. पोहरा नदीचे पाणी भांडेवाडीला जाण्यापासून प्रशासनाने तत्काळ थांबवावे या मागणीला घेऊन सोमवारी शेतकरी रस्त्यावर उतरले. शेतकऱ्यांनी शासन, प्रशासनाविरुद्ध तीव्र नारे-निदर्शने केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पोहरा नदीवर बांधलेला बंधारा विहीरगाव येथे अडविण्यात आला आहे. त्यामुळे २० ते २५ गावांमधील शेतकऱ्यांच्या सिंचनाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. पोहरा नदीचे पाणी भांडेवाडीला जाण्यापासून प्रशासनाने तत्काळ थांबवावे या मागणीला घेऊन सोमवारी शेतकरी रस्त्यावर उतरले. शेतकऱ्यांनी शासन, प्रशासनाविरुद्ध तीव्र नारे-निदर्शने केली.
संघर्ष जगण्याचा जनआंदोलन चळवळीच्या अध्यक्ष प्रा. अवंतिका लेकुरवाळे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. पोहरा नदीवरील पाण्यावर कामठी व कुही तालुक्यातील पांढुर्णा, तरोडी (बु), खेडी, परसोडी, टेमसना, पांढरकवडा, कुसुंबी, आदी २० ते २५ गावातील शेतीचे सिंचन होते. येथील ८० टक्के शेती पोहरा नदीच्या पाण्यावर होते. परंतु, मागील वर्षभरापासून विहीरगाव येथे पोहरा नदीचे पाणी बंधारा बांधून अडविण्यात आले व मनपाद्वारे पोहरा पंपिंग स्टेशनमधून पाणी भांडेवाडी येथील वॉटर ट्रीटमेंट प्लांटमध्ये आणून शुद्ध करण्यात येत आहे. शुद्ध केलेले २०० एमएलडी पाणी खापरखेडा येथील विद्युत निर्मिती केंद्राला पुरविण्यात येणार असल्याचा आंदोलनकर्त्याचा आरोप आहे. सध्या हा प्लांट पूर्ण न झाल्याने हे पाणी शुद्ध करून नागनदीला सोडण्यात येते. पाणी शुद्ध करण्याला विरोध नाही. परंतु, शुद्ध केल्यानंतर ते पाणी पुन्हा पोहरा नदीत सोडावे किंवा पोहरा पंपिंग हाऊस विहीरगावच्या बाजूच्या स्मॉल वॉटर ट्रीटमेंट प्लांट तयार करावा, विद्युत प्रकल्पाला पुरविण्यात येणारे २०० एमएलडी पाणी रद्द करावे व नदीचे खोलीकरण करून पाण्याची पातळी वाढवावी आदी शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत. दरम्यान हक्काच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांनी तीव्र नारे-निदर्शने करून १०० शेतकऱ्यांनी आंदोलनस्थळी मुंडण केले. नागपूर ग्रामीणचे तहसीलदार मोहन टिकले आंदोलनस्थळाला भेट दिली. त्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी पुरुषोत्तम शहाणे, हुकुमचंद आमदरे, रमेश जोध, सुरेश वर्षे, आशिष मल्लेवार वामन येवले, मनोहर कोरडे, तापेश्वर वैद्य, राजेंद्र लांडे, राजेश निनावे, राजेश ठवकर, क्रिष्णा शहाणे, दिनेश ढोले, अतुल बाळबुधे, प्रेम चांभारे, अमोल चांभारे, श्रीहरी देवगडे, संजय गावंडे, मदन गोमकर, मनोहरजी शहाणे, विलास मोहड, माणिक खेटमले, अमोल मोहड, केवल फळके आदींचा समावेश होता.
५ ऑगस्टपर्यंत पोहरा नदीचे पाणी शेतकऱ्यांना देण्याविषयी निर्णय न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा प्रा. अवंतिका लेकुरवाळे यांनी दिला.