मूठभर कापूस जाळून शेतकरी संघटनेने वेधले लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 10:29 PM2020-05-22T22:29:24+5:302020-05-22T22:34:22+5:30
केंद्र व राज्य सरकारचे धोरण शेतकरी विरोधी असल्याचे सांगत शेतकरी संघटनेने आज शुक्रवारी कापूस उत्पादक जिल्ह्यांमध्ये मूठभर कापूस जाळून निषेध व्यक्त केला. लॉकडाऊन असतानाही चार ते पाच जणांनी एकत्र येऊन तब्बल १७ जिल्ह्यांमध्ये हे आंदोलन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केंद्र व राज्य सरकारचे धोरण शेतकरी विरोधी असल्याचे सांगत शेतकरी संघटनेने आज शुक्रवारी कापूस उत्पादक जिल्ह्यांमध्ये मूठभर कापूस जाळून निषेध व्यक्त केला. लॉकडाऊन असतानाही चार ते पाच जणांनी एकत्र येऊन तब्बल १७ जिल्ह्यांमध्ये हे आंदोलन करण्यात आले. यावेळी सीसीआयने शेतकऱ्यांचा संपूर्ण कापूस खरेदी करावा आणि शासनाने भावांतर योजना लागू करावी, अशी मागणीही करण्यात आली.
नागपूरसह वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलडाणा आणि वाशिमसारख्या कापूस उत्पादक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर आंदोलक सहभागी झाले होते. नागपुरात शेतकरी संघटनेच्या कार्यालयात कापूस जाळून आंदोलन करण्यात आले. यात अरुण केदार, मुकेश मासुरकर, गुलाबराव धांडे, अरुण भोसले, विनोद चितळे आदी उपस्थित होते.
शेतकरी संघटनेचे प्रदेश प्रवक्ते राम नेवले यांनी राज्यात २४ हजार शेतकरी या आंदोलनात सहभागी झाल्याचे सांगितले. ते म्हणाले, खुल्या बाजारात व्यापारी प्रति क्विंटल ३ हजार ते ४२०० रुपयांचा भाव देऊन शेतकऱ्यांची लूट करीत आहेत. दुसरीकडे केंद्र सरकारची कंपनी सीसीआय ५५०० रुपये प्रति क्विंटलच्या भावाने खरेदी करीत आहे. आजही शेतकºयांजवळ ३५ टक्के कापूस शिल्लक आहे. तो तातडीने खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणीही त्यांनी केली.