अमरावतीच्या शेतकºयांचा सिंचन विभागात ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2017 12:08 AM2017-09-05T00:08:45+5:302017-09-05T00:09:17+5:30
धरणातील पाणी गळतीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ही नुकसान भरपाई तातडीने मिळावी,
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : धरणातील पाणी गळतीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ही नुकसान भरपाई तातडीने मिळावी, या मागणीसाठी सोमवारी अमरावतीतील नुकसानग्रस्त शेतकºयांनी थेट नागपूर गाठले आणि विदर्भ पाटबंधारे विभागाचे कार्यकारी संचालक सुर्वे यांच्या कॅबीनमध्येच ठिय्या मांडला. यावेळी या शेतकºयांनी सोबत आणलेली शिदोरी कार्यकारी संचालकांच्या कार्यालयातच उघडली आणि जेवणही उरकले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात या नुकसानग्रस्त शेतकºयांनी केलेल्या या शिदोरी आंदोलनाने अधिकाºयांसह सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. तब्बल अडीच तास हे आंदोलन चालले. अखेर अधीक्षक अभियंता पवार यांनी आंदोलनकर्त्या शेतकºयांशी चर्चा करून लवकरच नुकसानभरपाईसाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. तेव्हा या शेतकºयांनी आंदोलन मागे घेतले.
मौजा सोनगाव, कळमगाव ता. चांदूर रेल्वे जि. अमरावती येथील मौजा सोनगाव शिवणी प्रकल्पाचे पाणी पाझरून शेतात साचल्याने तेथील १७ शेतकºयांच्या पिकांचे व संत्र्याचे प्रचंड नुकसान झाले. त्यांना १४ लाख रुपये नुकसानभरपाई मिळायची आहे. या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात या शेतकºयांनी गेल्या ३ एप्रिल रोजी अमरावती येथे बैलबंडी आंदोलन केले होते. त्यावेळी ऊर्ध्व वर्धा सिंचन मंडळाच्या अधीक्षक अभियंता यांनी लवकरच निधी उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन दिले. परंतु चार महिने लोटूनही निधी मिळाला नाही. तेव्हा हे शेतकरी पुन्हा त्यांच्याकडे गेले, तेव्हा त्यांनी निधी नागपुरातील सिंचन कार्यालयात अडकून पडला असल्याचे सांगितले. अखेर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अमरावती जिल्हाध्यक्ष अमित अढाऊ, नागपूर जिल्हाध्यक्ष दयाल राऊत यांच्या नेतृत्वात वाल्मिक लोखंडे व इतर शेतकºयांनी सोमवारी नागपुरातील सिंचन विभागात येऊन थेट कार्यकारी संचालकांच्या कार्यालयात ठिय्या दिला. कार्यकारी संचालक सुर्वे हे सध्या मुंबईला बैठकीसाठी गेले होते. त्यामुळे ते कार्यालयात हजर नव्हते. त्यामुळे शेतकºयांनी त्यांच्या कॅबीनमध्येच ठाण मांडले. येताना त्यांनी आपल्यासोबत आणलेली शिदोरी सोडली व जेवण केले. दरम्यान आमचा निधी कधीपर्यंत दिला जाईल, हे एखादा जबाबदार अधिकारी सांगत नाही, तोपर्यंत आम्ही हटणार नाही, अशी भूमिका या शेतकºयांनी घेतली. यावेळी अधीक्षक अभियंता डॉ. पी.के. पवार यांनी या आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे लेखी आश्वासनही दिले. यानंतर शेतकºयांनी आंदोलन मागे घेतले. आंदोलनात अमित अढाऊ, दयाल राऊत, वाल्मिक लोखंडे, संकेत दुरुगकर, प्रशांत मोहोड, प्रवीण मोहोड, विलास आसोले, प्रशांत शिरभाते, दिनेश आमले आदी सहभागी होते.
धरणाला तडे, चौकशी व्हावी
सोनगाव शिवणी येथील धरण बांधून दोन वर्षे झाले. दोन वर्षातच धरणाला तडे गेले असून पाणी पाझरत आहेत. कंत्राटदारही पळून गेला आहे. या धरणाचे काम अतिशय निकृष्ट झाले असून याची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अमरावती जिल्हाध्यक्ष अमित अढाऊ यांनी यावेळी केली.
नियामक मंडळाची मंजुरी मिळताच निधी
कालवा दुरुस्ती अंतर्गत २५ लाख रुपयापर्यंतचे अधिकार मंडळाला आहेत. यासंदर्भातील प्रस्ताव शासनाला पाठविला असून मंजुरीही मिळालेली आहे. १४ लाख ९६ हजार रुपये नुकसानभरपाई निधी आहे. परंतु त्यासाठी नियामक मंडळाची मंजुरी आवश्यक असते. ही मंजुरी मिळताच हा निधी नुकसानग्रस्त शेतकºयांच्या स्वाधीन केला जाईल.
- डॉ. पी.के. पवार
अधीक्षक अभियंता, विदर्भ पाटबंधारे विभाग