विकासाच्या नावावर शेतकरी होतोय उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:13 AM2021-09-16T04:13:01+5:302021-09-16T04:13:01+5:30

कळमेश्वर : कळमेश्वर-सावनेर मार्गाचे चौपदीकरणाचे काम वेगात सुरू आहे. मात्र, या विकासकामाचा फटका स्थानिक शेतकऱ्यांना बसतो आहे. मौजा.घोराड प.ह.न.२० ...

Farmers are being destroyed in the name of development | विकासाच्या नावावर शेतकरी होतोय उद्ध्वस्त

विकासाच्या नावावर शेतकरी होतोय उद्ध्वस्त

Next

कळमेश्वर : कळमेश्वर-सावनेर मार्गाचे चौपदीकरणाचे काम वेगात सुरू आहे. मात्र, या विकासकामाचा फटका स्थानिक शेतकऱ्यांना बसतो आहे. मौजा.घोराड प.ह.न.२० शेती सर्व्हे क्रमांक ११० येथे नरेश भैय्याजी काकडे यांची ४.१६ हेक्टर शेती आहे. या शेतीत त्यांनी यंदा सोयाबीन पिकाची लागवड केली होती. या शेतालगत नाला असून, या नाल्याचे उत्खनन मे.दिलीप बिल्डकॉन कंपनीच्या वतीने करण्यात आली. नाल्याची माती रस्ते कामासाठी वापरण्यात आली. या कंपनीने नाल्याचे खोदकाम हे चुकीच्या पद्धतीने केल्यामुळे पावसामुळे काकडे यांच्या शेतातील बांध फुटले व नाल्याचे पाणी शेतात शिरले. यात त्यांच्या सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नाल्याचे खोदकाम करताना मे.दिलीप बिल्डकॉन कंपनीच्या वतीने येथून जड वाहनाची वाहतूक केल्याने, शेतात जाणाऱ्या रस्त्याचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्याला शेतीत वहिवाट करणे अशक्य झाले आहे. नाल्याचे शेतात शिरल्याने शेतातील पीक आणि माती वाहून गेली आहे, तसेच शेतात जागोजागी खड्डे पडले आहेत. काकडे यांनी यंदाच्या खरीप हंगामासाठी कळमेश्वर येथील बँक ऑफ इंडिया शाखेतून एक लाख रुपये कर्ज घेतले आहे. मात्र, यंदा उत्पादनच होणार नसल्याने बँकचे कर्ज कसे फेडायचे, हा प्रश्न काकडे यांच्यापुढे उभा ठाकला आहे.

प्रशासन गप्प का?

झालेल्या नुकसानीची माहिती काकडे यांनी कळमेश्वरचे तहसीलदार, जिल्हाधिकारी, तालुका कृषी अधिकारी, घोराड येथील तलाठी यांना एका अर्जाद्वारे कळविली. यानुसार, तलाठ्याच्या वतीने झालेल्या नुकसानीची पंचनामाही करण्यात आला. याचा अहवाल तहसीलदारांनाही सोपविण्यात आला. मात्र, जुलै महिन्यापासून शासकीय कार्यालयाच्या पायऱ्या झिजविण्याव्यतिरिक्त या शेतकऱ्याच्या हाती काही आलेले नाही.

पोलीस आणि गडकरी यांच्याकडे तक्रार

मे.दिलीप बिल्डकॉन कंपनीच्या वतीने काकडे यांना कोणत्याही स्वरूपाचे आश्वासन मिळाले नसल्याने, त्यांनी याबाबतची तक्रार कळमेश्वर पोलीस स्टेशन आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. आता पोलीस आणि गडकरी यावर काय कारवाई करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Web Title: Farmers are being destroyed in the name of development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.