शेतकरी उगारणार सरकारवर ‘आसूड’
By admin | Published: April 12, 2017 02:03 AM2017-04-12T02:03:44+5:302017-04-12T02:03:44+5:30
सत्तेत येण्यापूर्वी सरकारने शेतकऱ्यांसाठी स्वामीनाथन आयोग लागू करू, शेतकऱ्यांना उत्पादन खर्चापेक्षा ५० टक्के अधिक नफा मिळवून देऊ अशी वचने दिली होती.
बच्चू कडू यांच्या नेतृत्वात ‘सीएम टू पीएम’ आसूड यात्रा : स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा
नागपूर : सत्तेत येण्यापूर्वी सरकारने शेतकऱ्यांसाठी स्वामीनाथन आयोग लागू करू, शेतकऱ्यांना उत्पादन खर्चापेक्षा ५० टक्के अधिक नफा मिळवून देऊ अशी वचने दिली होती. परंतु एकहाती सत्ता आल्यानंतर सरकारच्या डोक्यात सत्तेची हवा गेली आहे. आम्ही शेतकऱ्यांचे नाहीच अशा अविर्भावात सरकार वागत आहे. शेतकऱ्यांच्या बाबतीत गल्लीतून दिल्लीपर्यंत सारखीच उत्तरे मिळत आहे. बैलाला वठणीस आणण्यासाठी जसा शेतकरी त्यांच्यावर आसूड उगारतो, तसेच गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतची सरकार शेतकऱ्यांचे ऐकत नसल्यामुळे शेतकरी सरकारवर आसूड उगारणार असल्याची भावना प्रहार संघटनेचे संस्थापक आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरापर्यंत ही आसूड यात्रा प्रहार व शेतकरी संघटनेच्या माध्यमातून काढण्यात आली आहे. ११ दिवसांच्या यात्रेला आमदार निवासातून सुरुवात झाली. बच्चू कडू व शेतकरी संघटनेचे रघुनाथ दादा पाटील यांच्या नेतृत्वात आसूड यात्रा नागपूरमार्गे वर्धेकडे निघाली आहे. यात्रेत राष्ट्रीय किसान मजदूर संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवकुमार शर्मा, राष्ट्रीय किसान युनियनचे हरियाणाचे गुरुनामसिंग सहभागी झाले आहेत. यात्रेत विदर्भातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहे. ११ दिवस ही यात्रा महाराष्ट्रातील वर्धा, यवतमाळ, नांदेड, परभणी, बीड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, अहमदनगर, औरंगाबाद, नाशिक, धुळे, नंदूरबार असा प्रवास करीत गुजरात येथील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वडनगर या जन्मगावी २१ एप्रिलला पोहचणार आहे. यात्रेच्या समापनाला हजारो शेतकरी व मृत शेतकऱ्यांच्या विधवा रक्तदान करून ‘शेतकऱ्यांचे रक्त घ्या, जीव घेऊ नका’ असा संदेश सरकारला देणार आहे. (प्रतिनिधी)
देशभरातील शेतकऱ्यांचा दिल्लीत घेराव
देशभरातील शेतकरी हा केवळ कर्जमुक्ती व लागत मूल्यापेक्षा अधिक हमीभाव यासाठी लढतो आहे. देशभरातील शेतकऱ्यांचा हा लढा जानेवारी २०१८ मध्ये दिल्लीत पोहचणार आहे. देशातील शेतकऱ्यांच्या ६० संघटना एकत्र येऊन, शेतकऱ्यांचा आवाज दिल्लीत पोहचविणार आहे. त्यासाठी महाराष्ट्रातून निघालेली आसूड यात्रा सरकारवर दबाव वाढविण्याचा एक भाग आहे.
-शिवकुमार शर्मा, अध्यक्ष, राष्ट्रीय किसान मजदूर संघ
आसूड यात्रेतून सरकारकडे मागण्या
स्वामीनाथन आयोगाच्या सर्व शिफारशी तातडीने लागू करा.
राज्यातील सर्व शेतकऱ्यांना तातडीने कर्जमुक्त करा.
पेरणी ते कापणीपर्यंतचा सर्व खर्च रोजगार हमी योजनेमार्फत जाहीर करा.
सर्व शेतमालावरील निर्यातबंदी हटवा.
शहराप्रमाणे गावातील नागरिकांना घरकूल योजनेचा लाभ द्या.
अपंग, विधवा महिला यांना दारिद्र्य रेषेची आणि उत्पन्नाची अट न ठेवता अंत्योदय योजना आणि घरकूल योजनेचा लाभ द्या.
अपंग, विधवा यांना ५००० रुपये प्रतिमाह मानधन द्या.