शेतकऱ्याची रोकड पळविली
By admin | Published: December 20, 2015 02:56 AM2015-12-20T02:56:25+5:302015-12-20T02:56:25+5:30
एका शेतकऱ्याची दीड लाखाची रोकड लुटारूने हिसकावून नेली. नंदनवनमध्ये शनिवारी दिवसाढवळ्या ही घटना घडली.
दीड लाख लंपास : नंदनवनमध्ये दिवसाढवळ्या घटना
नागपूर : एका शेतकऱ्याची दीड लाखाची रोकड लुटारूने हिसकावून नेली. नंदनवनमध्ये शनिवारी दिवसाढवळ्या ही घटना घडली. नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांची बजबजपुरी झाली आहे. त्यामुळे गुन्हेगार मोकाट सुटले असून, त्यांनी आज या शेतकऱ्याची रक्कम हिसकावून नेतानाच त्याच्या कुटुंबीयांवर जोरदार मानसिक आघात केला आहे.
आसाराम वडगूजी फुलझेले असे पीडित शेतकऱ्याचे नाव आहे. ते उमरेड मार्गावरील सेनापतीनगरात राहतात. त्यांची शेती गोसीखुर्द प्रकल्पात गेली असून, उदरनिर्वाहासाठी सध्या ते सेंट्रिंगचे काम करतात. शेतीची काही रक्कम त्यांनी अलाहाबाद बँकेत जमा केली आहे. मुलाचे शैक्षणिक शुल्क भरायचे असल्यामुळे फुलझेले यांनी शनिवारी दुपारी बँकेतून १ लाख ६० हजारांची रक्कम काढली. ती पिशवीत घालून सायकलने ते आपल्या घराकडे निघाले. माता मंदिराजवळ आले असताना सायकल जाम झाल्याने ते खाली उतरले. सायकलच्या चेनमध्ये सुतळी अडकून दिसल्याने ती काढण्यासाठी ते खाली वाकले. तेवढ्या वेळेत लुटारूने त्यांच्या सायकलच्या हॅण्डलला लटकवलेली १ लाख ६० हजारांची रोकड असलेली पिशवी घेऊन पळ काढला. या घटनेमुळे फुलझेले यांना जबर मानसिक धक्का बसला. त्यांनी आरडाओरड केल्यामुळे आजूबाजूची मंडळी धावली. एका गरीब शेतकऱ्याची रोकड दिवसाढवळ्या लुटल्याचे कळाल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी पोलिसांच्या नावाने शिमगा केला.
गेल्या काही महिन्यांपासून नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारूचे गुत्ते, जुगार अड्डे, मटक्याचे अड्डे बिनोबोभाट सुरू आहे. पोलीस ठाण्यातून परवानगी मिळाल्याप्रमाणे समाजकंटक अवैध धंदे करीत असून, त्यामुळे व्यसनाधीन गुन्हेगार आपला शौक पूर्ण करण्यासाठी बेधडक गुन्हे करीत आहेत. रोजच छोट्या मोठ्या चोऱ्या, घरफोडीच्या घटना घडतात. पोलिसांची कार्यपध्दत माहीत असल्यामुळे अनेक जण तक्रार देण्याचेही टाळतात. त्यामुळे या भागातील गुन्हेगार कमालीचे निर्ढावले असून, त्यातीलच लुटारूने फुलझेले यांची रोकड लंपास केली. (प्रतिनिधी)