शेतकऱ्यांनी केबल चाेरट्यांना पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:10 AM2021-09-26T04:10:01+5:302021-09-26T04:10:01+5:30
जलालखेडा : शेतातील इलेक्ट्रिक माेटरपंपच्या केबल चाेरीला जाण्याच्या घटना वाढत असतानाच शेतकऱ्यांनी केबल चाेरणाऱ्या दाेन चाेरट्यांना चाेरी करताना पकडले ...
जलालखेडा : शेतातील इलेक्ट्रिक माेटरपंपच्या केबल चाेरीला जाण्याच्या घटना वाढत असतानाच शेतकऱ्यांनी केबल चाेरणाऱ्या दाेन चाेरट्यांना चाेरी करताना पकडले आणि पाेलिसांच्या स्वाधीन केले. त्या दाेघांनाही पाेलिसांनी अटक केली. हा प्रकार जलालखेडा (ता. नरखेड) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील राेहणा शिवारात शुक्रवारी (दि. २४) रात्री ८ वाजताच्या सुमारास घडला.
नीलेश सुरेश कातलाम (२५) व विनोद विठ्ठल गायकवाड (३५) दोघेही रा. काटोल अशी अटक करण्यात आलेल्या चाेरट्यांनी नावे आहेत. दाेघेही शुक्रवारी रात्री एमएच-४०/डब्ल्यू-७५८८ क्रमांकाच्या माेटरसायकलने राेहणा शिवारात आले हाेते. त्यांनी कुणाच्या तरी शेतातील माेटरपंपच्या केबलची चाेरी केली आणि याच माेटरसायकलने केबल घेऊन जायला निघाले. याबाबत राेहणा येथील काही शेतकऱ्यांना संशय आला आणि त्यांनी दाेघांनाही शिताफीने पकडून चाैकशी केली.
ते चाेरटे असल्याचे स्पष्ट हाेताच शेतकऱ्यांनी लगेच पाेलिसांना सूचना देत दाेघांनाही पाेलीस ठाण्यात नेले. याप्रकरणी जलालखेडा पाेलिसांनी भादंवि ३७९, ३४ अन्वये गुन्हा नाेंदवून दाेघांनाही अटक केली. त्यांच्याकडून एमएच-४०/डब्ल्यू-७५८८ क्रमांकाची माेटरसायकल आणि ५० फूट इलेक्ट्रिक केबल जप्त केली. त्यांची चाेरी केल्याचे कबूल केले, अशी माहिती पाेलिसांनी दिली. या घटनेचा तपास बीट जमादार अनिल जाेशी करीत आहेत.
...
पाेलीस ठाण्याच्या आवारात गर्दी
शेतातील इलेक्ट्रिक माेटरपंप, केबल, माेसंबी व संत्राची झाडे तसेच शेतीपयाेगी साहित्य केबल चाेरीला जात असल्याने एकीकडे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान हाेत असून, दुसरीकडे ओलित खाेळंबत असल्याने पिकांचेही नुकसान हाेते. त्यातच दाेन चाेरट्यांना पकडल्याची माहिती मिळताच राेहणा येथील शेतकऱ्यांनी जलालखेडा पाेलीस ठाण्याच्या आवारात गर्दी केली हाेती. या भागातील चाेरीच्या घटनांना आळा घालण्याची मागणीही यावेळी शेतकऱ्यांनी ठाणेदार हरिश्चंद्र गावडे यांच्याकडे केली.
250921\img-20210925-wa0227.jpg
फोटो ओळी. ठाणेदार हरिश्चंद्र गावडे यांच्याशी चर्चा करताना प्रवीण जोध व शेतकरी.