शेतकऱ्यांच्या मुलांनी साकारला ‘फ्लाईंग ईव्ही’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2022 11:44 AM2022-01-02T11:44:26+5:302022-01-02T12:00:55+5:30
अपघातग्रस्तांना तातडीने उपचार मिळावे यासाठी दहेगाव रंगारी (जि.नागपूर) येथील शेतकऱ्यांच्या मुलांनी ‘फ्लाईंग ईव्ही’ नावाचा प्रकल्प साकारला आहे. त्यांच्या या प्रकल्पाला भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाने मान्यताही दिली आहे.
जितेंद्र ढवळे/अरुण महाजन
नागपूर : गोल्डन अवरमध्ये अपघातग्रस्त (गंभीर रुग्ण) रुग्णालयात वेळेत पोहोचू न शकल्याने अनेकांचे जीव गेले आहेत. महानगरात तर वाहतूक कोंडीमुळे रुग्णवाहिका रस्त्याच्या मधोमध अडकण्याच्या घटनाही नव्या नाहीत ! या सर्व गोष्टी टाळून रुग्णाला तातडीने उपचार मिळावे यासाठी दहेगाव रंगारी (जि.नागपूर) येथील शेतकऱ्यांच्या मुलांनी ‘फ्लाईंग ईव्ही’ नावाचा प्रकल्प साकारला आहे. त्याच्या या प्रकल्पाला भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाने मान्यताही दिली आहे.
बी. ई. मेकॅनिकल असलेला शुभम (डॅनी) अरविंद कोलते आणि त्याची बहीण शितल किशोर तराळे बी. ई .(इलेक्ट्रॅानिक्स) यांनी हा प्रकल्प तयार केला आहे. हेल्थ डिव्हाईस आणि ग्रीन कॅरिडॉर असे या प्रकल्पाचे दोन प्रमुख टप्पे आहेत. त्यास त्यांनी ‘फ्लाईंग ईव्ही’ असे नाव दिले आहे. शुभमचे वडील वेकोलिमध्ये पंप खलाशी म्हणून कामावर होते. निवृत्तीनंतर ते आता शेती करतात.
काय आहे हेल्थ डिवाईस ?
हेल्थ डिवाईस (हेल्थ कार्ड) या प्रकल्पाचा पहिला टप्पा आहे. याअंतर्गत प्रत्येक व्यक्तीची आरोग्यविषयक माहिती डिजीटल स्वरूपात साठविली जाईल. हे डिजीटल हेल्थकार्ड रुग्णांच्या आरोग्य तपासणीनंतर वेळोवेळी अपडेट केले जाईल.
कसे काम करेल हेल्थ डिवाईस ?
- या हेल्थ डिवाईसमध्ये बायोमॅट्रीक पद्धतीने प्रत्येकाची माहिती साठविली जाईल. समजा एखाद्या व्यक्तीचा अपघात झाला. त्यात तो बेशुद्ध झाला असला तरी बायोमॅट्रिक पद्धतीचा अवलंब करून त्याचा हेल्थ आयडी शोधला जाईल.
- हा आयडी रुग्णवाहिकेतील वैद्यकीय मदतनीस संबंधित रुग्णालयाला देईल. वैद्यकीय अधिकारी या आयडीच्या आधारावर संबंधित व्यक्तीची मेडिकल हिस्ट्री जाणून घेऊन योग्य ते उपचारही करू शकतील.
काय आहे ग्रीन कॅरिडोर?
- ग्रीन कॅरिडोर हा या प्रकल्पाचा दुसरा टप्पा आहे. यात अपघातग्रस्त व्यक्ती/रुग्णाला तातडीने रुग्णालयापर्यंत पोहोचविण्यासाठी व्यवस्था निर्माण केली जाईल. समजा महामार्गावर एखादा अपघात झाला तर रुग्णाला १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेच्या माध्यमातून रुग्णालयापर्यंत पोहोचविले जाते. या रुग्णवाहिकेत रुग्णाला टाकल्यानंतर रुग्णवाहिकेतील डिवाईस सर्व्हरच्या माध्यमातून ॲक्टिव्हेट होईल.
- अपघातग्रस्तस्थळापासून रुग्णालयात जाईपर्यंत मार्गात येणारे वाहतूक अडथळे दूर करण्यासाठी ही यंत्रणा काम करेल.
- समजा एखादी रुग्णवाहिका ‘अ’ स्थळापासून निघाली असेल आणि ‘ब’ आणि ‘क’ ठिकाणी वाहतूक कोंडी असेल तर तेथील वाहतूक सिग्नलवर असलेल्या डिवाईसच्या माध्यमातून रुग्णवाहिका रुग्णालयापर्यंत पोहोचिवण्यासाठी ग्रीन कॅरिडोर (वाहतूक मुक्त रस्ता) साकारला जाईल.
स्मार्ट सिटीसाठी तयार केला जातोय प्रस्ताव
नागपुरातील स्मार्ट सिटी प्रकल्पात ही संकल्पना वास्तवात साकारली जावू शकते का, यासाठी शुभम याच्याकडून प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या सीईओ भुवनेश्वरी एस. यांना याबाबतचे सादरीकरण शुभमने केले आहे.