बुजगावण्यानेही बदलले आपले रुपडे; पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांच्या नवनव्या क्लृप्त्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 11:19 AM2018-01-11T11:19:54+5:302018-01-11T11:20:57+5:30
बहरात आलेले पीक पक्ष्यांच्या तावडीतून वाचवण्यासाठी शेतकरी आपल्या शेतात बुजगावणे उभे करतो. एखाद्या काठीला मडके टांगून त्याला आपला जुना शर्ट अडकवून दिला की झाले बुजगावणे अशी आजवरची प्रथा होती. मात्र अलीकडे यात बरेच बदल घडून आले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर:
बहरात आलेले पीक पक्ष्यांच्या तावडीतून वाचवण्यासाठी शेतकरी आपल्या शेतात बुजगावणे उभे करतो. एखाद्या काठीला मडके टांगून त्याला आपला जुना शर्ट अडकवून दिला की झाले बुजगावणे अशी आजवरची प्रथा होती. मात्र अलीकडे यात बरेच बदल घडून आले आहेत.
निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना प्रत्येक हंगामात बसतो. या हंगामात उत्पादनात घट झाली तरी पुढील हंगामाची शेतकऱ्यांना आशा असते. त्यातूनच जिद्दीने, नव्या उमेदीने शेतकरी पुन्हा शेतकामात स्वत:ला झोकून देतो. शेतात बियाणे टाकल्यानंतर ते घरी येईपर्यंत शेतकऱ्यांच्या हृदयाची धडधड सुरूच असते. पिकांच्या संरक्षणासाठीही शेतकऱ्यांना मग विविध क्लृप्त्या योजाव्या लागतात. नागपूर जिल्ह्यात फेरफटका मारला असता अशा नवनव्या योजना शेतात उभारलेल्या दिसून येतात.
शेताभोवती सुकलेल्या झाडांचे काटेरी कुंपण करणे किंवा तारेचे कुंपण लावणे. तारांमधून वीज प्रवाहित करणे हाही एक प्रकार सुरू झाला आहे. मात्र याचा दुष्परिणाम म्हणून जंगली व पाळीव प्राण्यांना आपल्या जीवाला मुकावे लागले आहे. काही ठिकाणी नागरिकांनाही त्याचा धक्का लागल्याच्या बातम्या असतात. पक्ष्यांना व प्राण्यांना पळवून लावण्यासाठी माणसाचे आवाज किंवा वन्यप्राण्यांचे आवाज रेकॉर्ड करून ते शेताजवळ लावले जातात. जेणेकरून त्या आवाजामुळे कुठला प्राणी तिकडे फिरकूच नये. काही ठिकाणी शेतात फटाकेही फोडले जातात. त्या आवाजाने जवळपास असलेले प्राणी अधिक दूर जातील. त्याद्वारे शेतात आलेल्या वन्यप्राण्यांना, पक्ष्यांना शेतकरी परतवून लावतो, सोबतच चोरट्यांपासूनही पिकाचे संरक्षण करतो.