शेतकऱ्यांनाे, धुळ पेरणीची करू नका घाई; तुर्तास मान्सून कमकुवत राहण्याची शक्यता
By निशांत वानखेडे | Published: June 14, 2023 06:07 PM2023-06-14T18:07:47+5:302023-06-14T18:08:35+5:30
विदर्भात पाच दिवस उष्ण लाटेसारखी स्थिती
नागपूर : नैऋत्य मान्सूनच्या आगमनाची चाहुल लागल्याने शेतकरी बांधवांनाही पेरणीची घाई झाली आहे. गेल्या वर्षीच्या पावसामुळे असलेला जमिनीचा ओलावा पाहून शेतकरी धुळ पेरणीची तयारी करीत आहेत. मात्र सध्यातरी मान्सून अधिक सक्रिय झाला नसून त्याची स्थिती कमकुवत आहे. त्यामुळे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी धुळपेरणीची घाई करू नये किंवा पेरणी टाळावी, असा इशारा हवामान तज्ज्ञांनी दिला आहे.
निवृत्त हवामान अधिकारी माणिकराव खुळे यांनी सध्याच्या हवामानाच्या स्थितीचे अवलोकन करीत शेतकऱ्यांना आवाहन केले आहे. त्यांच्या मते केरळहून निघालेल्या मान्सूनचे ४ दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे प्रवेशद्वारे म्हणजे सिंधूदुर्गात आगमन झाले होते. मात्र त्याच्या मार्गक्रमणात कोणतीही प्रगती झाली नसून आहे त्याच स्थितीत खिळला आहे. ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाचाही मान्सूनच्या मार्गक्रमणावर सकारात्मक परिणाम झाला नाही. त्यामुळे विदर्भात स्थिती विपरित आहे. ढगाळ वातावरणामुळे किरकोळ पाऊस होत असला तरी तो मान्सूनचा पाऊस नाही. उलट पुढचे पाच दिवस म्हणजे १९ जूनपर्यंत विदर्भात उष्ण लाटेसारखी स्थिती राहणार असल्याची शक्यता खुळे यांनी व्यक्त केली.
ढगाळ वातावरण असले तरी दिवसाचा पारा ४२ अंशाच्या आसपास कायम आहे. ही स्थिती शेतकऱ्यांसाठी अनुकूल नाही. २० जूनच्या आसपास सुरु होणाऱ्या मोसमी पावसातून २३ ते ३० जून दरम्यान शेवटच्या आठवड्यात पेरणीयोग्य अश्या पावसाची अपेक्षा करता येऊ शकते. अशावेळी जमिनीचा ओलावा ८ इंचपर्यंत असेल तरच पेरणीचा विचार शेतकऱ्यांनी करावा. अन्यथा थोडी प्रतीक्षा करूनच पेरणीचा विचार करावा, असे आवाहन खुळे यांनी केले.
अल-निनो सक्रिय, आयओडीवर भिस्त
दरम्यान पावसाला रोखणारा अल-निनो १५ जुलैनंतर सक्रिय होण्याचा अंदाज होता पण ‘नोआ’ या अमेरिकन हवामान संस्थेनुसार अल-निनो आताच विकसित झाला आहे. त्यामुळे १५ जुलैपर्यंत अपेक्षित पाऊस कोसळण्याची शक्यताही कमीच वाटत आहे. जूनमध्ये आतापर्यंत मान्सून ५० टक्के सरासरीही गाठू शकला नाही. त्यामुळे आता पावसासाठी पूर्ण भिस्त इंडियन ओशन डायपोल (आयओडी) यावर अवलंबून असल्याचे माणिकराव खुळे यांनी स्पष्ट केले.