शेतकऱ्यांचे शेत होणार हिरवेगार!
By admin | Published: May 18, 2015 02:41 AM2015-05-18T02:41:00+5:302015-05-18T02:41:00+5:30
सध्या कृषी विभागाच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानातर्गंत सिंचनाची विविध कामे सुरू आहेत.
नागपूर : सध्या कृषी विभागाच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानातर्गंत सिंचनाची विविध कामे सुरू आहेत. जुन्या नाल्यांचे खोलीकरण करणे, नवीन बंधारे बांधणे, पाणी अडविणे अशी विविध कामे केली जात आहेत. यातून भविष्यात शेतकऱ्यांचे शेत हिरवीगार दिसणार आहे. अशीच हिंगणा तालुक्यात झपाट्याने कामे सुरू आहेत. त्या कामांची स्वत: राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी दखल घेऊन प्रत्यक्ष पाहणी केली.
शनिवारी मुख्य सचिवांनी हिंगणा तालुक्यातील ऊखळी येथे भेट दिली. कृषी विभागाने या गावात सुमारे २० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या ९ सिमेंट बंधाऱ्यांची निवड करू न, जलयुक्त शिवार अभियानातर्गंत त्यांच्या खोलीकरणाची कामे केली आहेत. कृषी अधिकाऱ्यांच्या मते, मागील १९९४-९५ मध्ये हे सिमेंट बंधारे बांधण्यात आले होते. परंतु त्यात आता गाळ भरल्याने पाणी साठा होत नव्हता.
या अभियानातर्गंत बंधाऱ्यातील तो गाळ काढून शेतकऱ्यांच्या शेतात टाकण्यात आला. यामुळे बंधाऱ्याची खोली वाढली असून, गाळामुळे शेतकऱ्यांच्या शेतीची सुपिकताही वाढली आहे. बंधाऱ्याच्या खोलीकरणामुळे पावसाळ्यात किमान ४० टीसीएम पाणी जमिनीत मुरल्याने विहिरींच्या पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
मुख्य सचिवांनी कृषी विभागातर्फे करण्यात आलेल्या या कामांचे मुक्तकंठाने कौतूक करून, भविष्यात तालुक्यातील सर्व गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियान राबवून सर्व गावे टॅँकर मुक्त करावे, असेही आवाहन केले.
यावेळी क्षत्रिय यांच्यासह विभागीय आयुक्त अनूपकुमार, जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी शिवाजीराव जोंधळे, विभागीय कृषी सहसंचालक विजय घावटे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ. अर्चना कडू, उपविभागीय कृषी अधिकारी विजय निमजे, तहसिलदार राजू रणवीर, खंड विकास अधिकारी जुवारे, तालुका कृषी अधिकारी रत्नाकर येवले, मंडळ कृषी अधिकारी संजय भगत, कृषी पर्यवेक्षक शिंदे, कृषी सहाय्यक वंजारी, यांच्यासह सरपंच ममता बोंदाडे , उपसरपंच बाविस्कर, प्रगतिशील शेतकरी नितीन बंग उपस्थित होते. (प्रतिनिधी)