जिल्ह्यात कापूस, सोयाबीनवर शेतकऱ्यांचा भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:06 AM2021-07-12T04:06:30+5:302021-07-12T04:06:30+5:30
नागपूर : जिल्ह्यातील कृषी क्षेत्रावर यंदा कापूस आणि सोयाबीनचे क्षेत्र वाढले आहे. कापसाची लागवड ९५ टक्क्यांहून अधिक कृषी क्षेत्रावर ...
नागपूर : जिल्ह्यातील कृषी क्षेत्रावर यंदा कापूस आणि सोयाबीनचे क्षेत्र वाढले आहे. कापसाची लागवड ९५ टक्क्यांहून अधिक कृषी क्षेत्रावर तर सोयाबीनची लागवड ८२ टक्क्यांवर झाली आहे. नगदी पिकाकडे शेतकरी वळले असले तरी सध्या सोयाबीनवर खोडकिडीचा प्रादुर्भात जिल्ह्यात दिसत आहे.
नागपूर जिल्ह्याचे एकूण कृषी क्षेत्र (ऊस पीक वगळून) ४, ७४,३२५.१ हेक्टर आहे. मागील वर्षी ३,४७,१३० हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली होती. या वर्षीच्या हंगामात दोन दिवसांपूर्वीच्या आकडेवारीनुसार, ३,५४,६२३.४८ हेक्टर कृषी क्षेत्रावर लागवड करण्यात आली आहे.
जिल्ह्यात कापसाचे क्षेत्र २,०९,२४९.२ हेक्टर आहे. मागील वर्षी १,९१,९०५ हेक्टरवर कापसाची लागवड झाली होती. यंदा त्यापेक्षा अधिक म्हणजे २ लाख ३७५.१हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली आहे. सोयाबीनची लागवडही सरासरीने त्या पाठोपाठ आहे. सोयाबीनचे सर्वसाधारण क्षेत्र १,१०,५३२.६ हेक्टर आहे. यंदा ९०,७६६ हेक्टरवर म्हणजे ८२ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. मागील वर्षी सोयाबीनचे क्षेत्र ९४,३२९ हेक्टर होते. या वर्षी पावसामुळे त्यात घट दिसत आहे.
...
खोडमाशी वाढली
जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये खोडमाशीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. चमकदार, आकाराने लहान असलेली २ मिमी आकाराचे लहान, काळ्या रंगाची चमकदार माशी हे या खोडअळीचे प्रौढ रूप आहे. अंड्यातून निघालेली बिन पायाची अळी सोयाबीनचे रोपटे लहान असतानाच पाने पोखरून देठातून झाडाच्या मुख्य खोडात किंवा फांदीत प्रवेश करते.
आतील भाग पोखरून खातात. सोयाबीन १० ते १५ दिवसांचे असताना प्रादुर्भाव झाल्यास झाड वाळते, झाडांची संख्या घटल्याने दुबार पेरणीची वेळ येते. भविष्यात अशा झाडांच्या फुलांची गळ होते, दाण्याच्या वजनात १६ ते ३० टक्के घट येते.
...
कृषी विभागाचा सल्ला
जिल्हा कृषी अधिक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे यांनी कळविल्यानुसार, खोडकिडीसाठी उष्ण तापमान, अधिक आर्द्रता, भरपूर पाऊस, कोरडे वातावरण पोषक असते. शेतकऱ्यांनी किडग्रस्त झाडाचा नायानाट करावा. यामुळे किडीची वाढ होत नाही. उगवणीनंतर ८ ते १० दिवसांनी हेक्टरी २५ चिकट सापळे लावावे. पीक १५ दिवसांचे झाल्यावर इथियॉन ५० टक्के (३० मिली) किंवा इंडोक्वार्फ १५.८ टक्के (६.७ मिली) किंवा क्लोरान्टरानिप्रोल १८.५ टक्के (३ मिली) एक लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
...