पाच वर्षांत शेतकऱ्यांचे उत्पन्न होईल दुप्पट
By admin | Published: March 7, 2017 04:44 AM2017-03-07T04:44:12+5:302017-03-07T04:44:12+5:30
सर्वांगीण विकासाला गती देण्यात येत असल्याचे सांगतानाच येत्या पाच वर्षांत राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होईल
मुंबई : कृषी-जलसंधारण, पायाभूत सुविधांसह महाराष्ट्राच्या शाश्वत आणि सर्वांगीण विकासाला गती देण्यात येत असल्याचे सांगतानाच येत्या पाच वर्षांत राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होईल, असा विश्वास राज्यपाल सी.विद्यासागर राव यांनी आज विधिमंडळाच्या संयुक्त सभागृहासमोरील अभिभाषणावेळी व्यक्त केला. राज्यपालांच्या अभिभाषणाने विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला प्रारंभ झाला.
राज्यपाल म्हणाले की, कृषी उत्पादनात वाढ करण्यासाठी शासनाने शाश्वत विकास योजना राबविली असून याअंतर्गत पणनविषयक सहाय्य, पीक विमा, जलसंधारण, सिंचन व कृषी वैविध्य अशा शेतकरी हिताच्या उपाययोजनांमुळे त्यांचे उत्पन्न दुप्पट होईल.
हवामान अनुकूल कृषी विकास प्रकल्पांतर्गत विदर्भ आणि मराठवाड्यातील ४ हजार गावांना दुष्काळापासून संरिक्षत करण्यासाठी ४ हजार कोटी रु पयांचा जागतिक बँक अर्थसहाय्यित ‘‘ नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प’’ सुरु करण्यात येत आहे. त्याने मागास भागातील कृषी क्षेत्राचे चित्र बदलेल.
पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत १ कोटी ८० लाख शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून महाराष्ट्र या बाबत देशात आघाडीवर आहे. आतापर्यंत ४८ लाख शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ देण्यात आला आहे, असे त्यांनी नमूद केले. ५ हजार ५० रुपये क्विंटल या दराने तूरडाळीची खरेदी राज्य शासनाने आतापर्यंत केली आहे.
परवडणाऱ्या घरांची उभारणी, गरिबांसाठीची घरे, प्रगत
शैक्षणिक कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी आदींचा उल्लेख राज्यपालांनी केला. छत्रपती शिवाजी महाराज यांचे
अरबी समुद्रातील स्मारक आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे महापौर बंगल्यातील स्मारक उभारण्यास सरकार वचनबद्ध असल्याचे ते म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)
>राज्यपालांच्या अभिभाषणातून
अपराधिसद्धीच्या प्रमाणात ५८ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. मोअर क्रॉप पर ड्रॉप’ या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वप्नाची पूर्तता मराठवाड्यात करणार. त्या अंतर्गत पुढील तीन वर्षांत १.२५ लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आणणार.२६ सिंचन प्रकल्प येत्या तीन वर्षांत पूर्ण करून ५.५६ लाख हेक्टर सिंचन क्षमता निर्माण करणार‘‘संत शिरोमणी श्री सावता माळी आठवडी शेतकरी बाजार अभियान’’अंतर्गत ९२ आठवडी बाजार सुरू केले.जलयुक्त शिवारमध्ये २.५ लाखाहून अधिक कामे केली. या अभियानात ५०० कोटी रुपये लोकसहभागातून जमा झाले. कोल्हापूर, पुणे, नवी मुंबई महापालिका, १०० नगर परिषदा, ४ जिल्हे, ७३ तालुके आणि ११ हजार ३२० गावे हागणदारीमुक्त केली.नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग, वांद्रे-वरळी सागरी सेतू आणि ३० हजार किमीचे ग्रामीण रस्ते यांची उभारणी करण्याचा निर्धार.नवी मुंबई विमानतळ, मुंबई, नागपुरात मेट्रो रेल्वेची कामे वेगाने.मुंबईत सशुल्क वाहन तळांची उभारणी करणार.
>८५ हजार कोटींची गुंतवणूक
उद्योगांची उभारणी सुलभ व्हावी म्हणून अनेक परवानग्या कमी करण्यात आल्या. एक खिडकी योजना सुरू झाली. राज्यात ८५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आली आणि १ लाख ५५ हजार नवीन नोकऱ्या मिळाल्या. गुंतवणुकीतील राज्याच्या हिश्यात ५० टक्के वाढ झाली. थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात अव्वल असल्याचे राज्यपालांनी सांगितले.
>अभिभाषणातून घोर निराशा - विखे पाटील
राज्यपालांचे अभिभाषण सरकारच्या ध्येय धोरणाचा आरसा असते. या अभिभाषणातून आगामी वर्षातली राज्याची दिशा, सरकारचे धोरण स्पष्ट होते. परंतु, यंदाच्या अभिभाषणातून महाराष्ट्राच्या विशेषत: शेतकऱ्यांच्या हाती केवळ निराशाच आली. रविवारी सायंकाळी आम्ही राज्यपालांची भेट घेऊन शेतकरी कर्जमाफीसंदर्भात राज्य सरकारला निर्देश देण्याची मागणी केली होती.
राज्य सरकार राज्यपालांच्या अभिभाषणातून शेतकरी कर्जमाफी संदर्भात आपली ठोस भूमिका जाहीर करेल, अशी आस शेतकरी धरून बसले होते. परंतु, शेतकरी आत्महत्या वाढत असताना अभिभाषणातून जुन्याच निर्णयांची उजळणी केली, अशी प्रतिक्रिया विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.